जास्त पाणी लागल्यास पाणीकपात करण्याची जलसंपदा विभागाची पालिकेला सूचना

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जलसंपदा विभागाकडून पुणे शहर आणि जिल्ह्य़ाला १५ जुलैपर्यंतच्या पाणीपुरवठय़ाचे चोख नियोजन करण्यात आले आहे. सद्य:स्थितीत खडकवासला धरणसाखळीमध्ये ७.३० टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून उपलब्ध पाणीसाठय़ाचे पावसाळा सुरू होण्यापर्यंतचे नियोजन केले आहे. या नियोजनामध्ये शहरासाठी तीन टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला असून राखीव ठेवलेल्या पाणीसाठय़ापेक्षा अधिक पाणी लागल्यास किंवा पाऊस लांबल्यास पुणे महापालिकेने पाणीकपात करावी, अशा स्पष्ट सूचना जलसंपदा विभागाने दिल्या.

खडकवासला धरणसाखळीमध्ये खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर अशी चार धरणे येतात. यांपैकी टेमघर धरणाची दुरूस्ती सुरू असल्याने गेल्या वर्षी पावसाळ्यात धरणामध्ये पाणीसाठा करण्यात आला नाही. तसेच, वरसगाव धरणाची दुरूस्ती नुकतीच सुरू केल्याने हे धरणही रिकामे करण्यात आले आहे. त्यामुळे खडकवासला आणि पानशेत धरणांमध्ये अनुक्रमे १.०५ आणि ६.२५ असे एकूण ७.३० टीएमसी एवढाच उपलब्ध पाणीसाठा १६ मे अखेपर्यंत शिल्लक आहे. हा उपलब्ध पाणीसाठा पाऊस सुरू होईपर्यंत पुरवायचा असल्याने जलसंपदा विभागाकडून पाण्याचे चोख नियोजन करण्यात आले आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर पुणे महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना आणि खबरदारी घेण्यात यावी. तसेच पुणेकरांनी काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे.

उपलब्ध पाणीसाठय़ाचे नियोजन

  • खडकवासला धरणसाखळीमधील खडकवासला आणि पानशेत अशा दोन धरणांमध्ये मिळून एकूण ७.३० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. यापैकी तीन टीएमसी पाणी दुसऱ्या उन्हाळी आवर्तनासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
  • ०.६० टीएमसी पाण्याचे कडक उन्हाळ्यामुळे बाष्पीभवन होणार असल्याचे गृहीत धरण्यात आले आहे. ०.७६ टीएमसी पाणी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी, ग्रामपंचायत आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये वापरण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
  • तर, तीन टीएमसी पाणी पुणे शहरासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

खडकवासला धरण साखळीत १६ मे अखेपर्यंत ७.३० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. शहरासाठी तीन टीएमसी पाणी राखीव ठेवण्यात आले असून राखीव पाण्यापेक्षा अधिक पाणी लागल्यास किंवा १५ जुलैपर्यंत पाऊस न पडल्यास पुणे महापालिकेला पाणीकपात करावी लागेल.

पांडुरंग शेलार, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune gets three tmc of water till the monsoon pune water crisis
First published on: 17-05-2018 at 01:05 IST