पुणे : हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे गुढीपाडव्यानिमित्त शहराच्या मध्य भागात रविवारी (३० मार्च) भव्य मिरवणूक काढून नववर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे. महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सकाळी साडेआठ वाजता सुरू होणाऱ्या मिरवणुकीमध्ये पारंपरिक पेहरावात हजारो पुणेकर सहभागी होणार आहेत. ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंदिराजवळ ग्रामगुढीची उभारणी करण्यात येणार आहे.  अशी माहिती समितीचे संयोजक राघवेंद्र मानकर व सहसंयोजक अश्विन देवळणकर यांनी दिली.

लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सुरू होणाऱ्या मिरवणुकीचा तुळशीबाग राममंदिर, शनिपार, लिंबराज महाराज चौक, आप्पा बळवंत चौक असा मार्ग असून तांबडी जोगेश्वरी मंदिर येथे समारोप होणार आहे. यावेळी रा.स्व.संघाचे अधिकारी व विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या विविध महिलांच्या हस्ते गुढी उभारण्यात येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दीनिमित्त त्यांना अभिवादन करणारा अहिल्यादेवी  होळकर रथ, भजनी मंडळ, पर्यावरणचे भान राखून प्रबोधनपर ‘पाणी’ विषयावरील रथ, छत्रपती शिवाजी महाराज रथ, तसेच वंदे मातरम काव्याच्या दीडशेव्या वर्षानिमित्त या काव्याची माहिती देणारा रथ, प्रभू श्रीराम रथ, ढोल-ताशा पथक, शंख पथक, बँडपखक, मर्दानी खेळ तसेच वेत्रचर्म प्रात्यक्षिके सादर करणारे पथक मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. सोमवंशीय क्षत्रिय कासार श्री कालिकादेवी संस्थान तसेच मराठी अभिजात भाषा रथ मिरवणुकीत असेल, अशी माहिती समितीचे संयोजक राघवेंद्र मानकर आणि सहसंयोजक अश्विन देवळणकर यांनी शुक्रवारी दिली.

ऐतिहासिक, आध्यात्मिक, स्वातंत्र्यलढ्यातील थोर व्यक्तिमत्त्वांचा आदर्श ठेवून केलेल्या वेशभूषेतील नागरिक मोठ्या संख्येत सहभागी होतील. पुणेकरांनी भगव्या टोप्या, भगवे फेटे घालून, धर्मध्वज (भगवा) हातात घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सांस्कृतिक कलावंत गुढी

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे रविवारी (३० मार्च) यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सकाळी दहा वाजता सांस्कृतिक कलावंत गुढी उभारली जाणार आहे. मराठी नववर्ष आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‌‘कुटंब कीर्तन‌’ या नाटकातील कलाकार वंदना गुप्ते आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्या हस्ते गुढी पूजन होणार असून माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी दिली.