पुणे : ‘राज्यातील पहिले ‘हेलिपोर्ट’ पुण्यातील हडपसर ग्लायडिंग केंद्राच्या जागेवर उभारण्यात येणार असून, या ठिकाणी जागतिक दर्जाची देशातील पहिली ‘एव्हिएशन गॅलरी’ साकारण्यात येणार आहे. लवकरच संबंधित २३० एकर जागेचा ताबा भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे हस्तांतरित होईल. त्यानंतर भविष्यकालीन हवाई उड्डाणांच्या दृष्टीने हेलिपोर्टसाठी सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्यात येईल,’ अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी दिली.
पश्चिम भागातील पर्यटन क्षेत्र, व्यवसाय आणि इतर कामानिमित्त पुण्यातून सर्वाधिक हेलिकाॅप्टरची उड्डाणे सुरू असतात. त्याचा इतर हवाई उड्डाणांवर परिणाम होतो. त्यामुळे स्वतंत्र नियोजन आणि पायाभूत सुविधांनी विकसित हवाई उड्डाणांसाठी स्वतंत्र ‘हेलिपोर्ट’ तयार करण्यात येणार आहे. यामुळे हवाई उड्डाणांमध्ये सुधारणा करण्यात येईल.
हडपसर येथील ग्यायडिंग केंद्र २३० एकर क्षेत्रावर उभे आहे. सध्या ही मालमत्ता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या ताब्यात आहे. गेल्या दशकापासून या केंद्राचा वापर प्रशिक्षणार्थी व विमानप्रेमींसाठी होत आहे. ग्लायडिंग सेंटरचा भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे ताबा आल्यानंतर या प्रकल्पाबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येईल. हवाई विभाग आणि इतर विभागांकडून परवानगी मिळाल्यानंतर या प्रकल्पाची मुहूर्तमेढ होईल.
‘नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या कौशल्य विकास आणि माहिती-तंत्रज्ञान विभागाने ४ मार्च २०२२ रोजी या जागेचा व मालमत्तांचा ९९ वर्षांच्या कालावधीसाठी हस्तांतरण करण्याचा निर्णय घेतला. प्रतिवर्ष नाममात्र एक रुपया दराने ही जागा भारतीय विमानतळ प्राधिकरणाला देण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील विमान वाहतुकीच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठा बदल घडून आणण्यासाठी आणि हेलिकॉप्टर-आधारित सेवांना चालना देण्यासाठी हेलिपोर्ट उभारण्याचा मानस आहे,’ असे मोहोळ यांनी सांगितले.
मोहोळ म्हणाले, ‘हा प्रकल्प विचारात असून अद्याप कुठला प्रस्ताव बनविण्यात आलेला नाही. मात्र, या ठिकाणी हेेलिपोर्ट बनल्यानंतर वैद्यकीय सेवांसह, पर्यटन, आपत्कालीने सेवा, व्यावसायिक प्रवास यासाठी उपयोगी ठरेल. भौगोलिकदृष्ट्या ही जागा महत्त्वाची असून नागरी विमान वाहतुकीच्या दृष्टीने एक महत्त्वाचे केंद्र ठरू शकते. पुणे जिल्ह्यात अशी दोन हेलिपोर्ट्स उभारण्याचा आमचा मानस आहे, एक हडपसर येथे, तर दुसऱ्या जागेबाबत शोध सुरू आहे.’
जागतिक दर्जाची एव्हिएशन गॅलरी
मोहोळ म्हणाले, ‘ग्लायडिंग सेंटरमध्ये जागतिक दर्जाची ‘एव्हिएशन गॅलरी’ उभारण्याचा मानस आहे. यामध्ये संग्रहालयाबरोबरच एक संवादात्मक, शैक्षणिक व अनुभवात्मक माहिती मिळेल. त्याला एक पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात येईल. या ठिकाणी भारताचे जागतिक विमानवाहतुकीतील योगदान अधोरेखित केले जाईल. या गॅलरीमध्ये जुन्या विमानांपासून आधुनिक विमानांचे शोध, सिम्युलेटर, ऐतिहासिक माहिती व डिजिटल प्रदर्शन समाविष्ट असेल. नागरी व लष्करी विमानवाहतुकीच्या अभ्यासासाठी ते फायद्याचे ठरेल.’