पुणे : यंदा २६ मे रोजीच मोसमी वारे शहरात दाखल झाले असून, मोसमी वारे मे महिन्यात पुण्यात पोहोचण्याची ही पाचवी वेळ आहे. मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीबाबत भारतीय हवामानशास्त्र विभागाने माहिती दिली. यंदाचा मे महिना पुणेकरांना पावसाळी अनुभव देणारा ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरात सातत्याने ढगाळ वातावरण असून, पाऊसही पडत आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, सर्वसाधारणपणे मोसमी वारे शहरात जूनमध्ये दाखल होतात. मात्र, यंदा १९६२ मध्ये नोंद झालेल्या तारखेच्याही आधी दाखल होऊन मोसमी वाऱ्यांनी नवा विक्रम नोंदवल्याचे स्पष्ट झाले आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप म्हणाले, ‘मोसमी वारे साधारणपणे ६ जूननंतर पुण्यात पोहोचतात. मात्र, गेल्या काही वर्षांचा आढावा घेतला असता, यंदा पहिल्यांदाच इतक्या लवकर मोसमी वारे पुण्यात दाखल झाले आहेत. मोसमी वाऱ्यांनी वेगाने वाटचाल केली आहे. कमी दाबाचे क्षेत्र, तीव्र असलेले नैर्ऋत्य मोसमी वारे अशा कारणांनी सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे.’
मोसमी वारे मे महिन्यात पुण्यात दाखल होण्याच्या घटना
१९६२ : २९ मे
१९७१ : ३१ मे
१९९० : ३१ मे
२००६ : ३१ मे
गेल्या काही वर्षांत शहरात मोसमी पाऊस दाखल झाल्याच्या तारखा
२०२४ : ९ जून
२०२३ : २४ जून
२०२२ : ११ जून
२०२१ : ६ जून
२०२० : १४ जून
२०१९ : २४ जून
२०१८ : ९ जून
२०१७ : १२ जून
२०१६ : २० जून
२०१५ : १२ जून
२०१४ : १४ जून
२०१३ : ८ जून