पुणे : पुण्यातील विविध औद्योगिक क्षेत्रांमधील विजेची समस्या वारंवार समोर येत आहे. त्यात चाकण औद्योगिक क्षेत्रात या समस्येने गंभीर रूप धारण केले होते. अखेर ही समस्या सोडविण्यासाठी महावितरणने पावले उचलली आहेत. चाकण वीज उपकेंद्राच्या क्षमतेत वाढ करण्यात आली आहे. लवकरच हे उपकेंद्र क्षमतावाढीसह सुरू होणार आहे. यामुळे या परिसरातील उद्योगांची वीज संकटातून मुक्तता होणार आहे.

चाकण परिसरात गेल्या काही महिन्यांपासून विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे. चाकण परिसरातील महावितरणच्या यंत्रणेवर जास्त ताण येत असल्याने विजेची टंचाई निर्माण झाली आहे. याचा विपरीत परिणाम उद्योगांवर होत आहे. वीजपुरवठा खंडित होण्याचे आणि कमी-जास्त दाबाने वीजपुरवठा होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे उद्योगांमधील यंत्रांना फटका बसत आहे. कच्चा मालही वाया जाण्याचे प्रमाण अधिक आहे. उद्योजकांचे आर्थिक नुकसान होत आहे.

हा विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजने महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांची ऑगस्ट महिन्यात भेट घेतली होती. उद्योगांकडून महावितरणला पायाभूत यंत्रणा उभारण्यासाठी, स्विचिंग स्टेशन, पॉवर स्टेशन यासाठी स्वखर्चाने जागा देण्यात येते. तसेच, उद्योग फिडरसाठी लाखो रुपये खर्च करतात. तरीही, उद्योगांना महावितरणकडून सुरळीत वीजपुरवठा केला जात नाही, ही बाब उद्योगांच्या वतीने निदर्शनास आणून देण्यात आली होती.

यानंतर अखेर महावितरणने तातडीने पावले उचलली आहेत. चाकणमधील ५०० एमव्हीए क्षमतेच्या वीज उपकेंद्रात आणखी एक ५० केव्हीएचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे. याची पाहणी महावितरणचे अधीक्षक अभियंता युवराज जरग यांच्यासह फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाने नुकतीच केली. हे उपकेंद्र क्षमतावाढीसह २१ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यामुळे रेणुका सिटी, सारा सिटी, नाणेकरवाडी आणि कुरूळी या भागातील वीजपुरवठा सुरळीत होणार आहे.

वीज उपकेंद्राची क्षमता वाढल्याने चाकण औद्योगिक क्षेत्रातील वीज समस्या सुटणार आहे. याचा फायदा मर्सिडीज बेंझ, सॅनी, बजाज, बॉश यांसारख्या मोठ्या कंपन्यांसह अनेक छोट्या कंपन्यांना होणार आहे. हे उपकेंद्र क्षमतावाढीसह २१ सप्टेंबरला सुरू करण्यासाठी वीजपुरवठा काही काळ खंडित केला जाणार आहे. त्यामुळे या काळात कंपन्यांनी पर्यायी व्यवस्थेची तयारी करावी.- दिलीप बटवाल, मुख्याधिकारी, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज

चाकण वीज उपकेंद्राच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. यामुळे वीज यंत्रणेवरील ताण कमी होणार आहे. यामुळे उद्योगांना सुरळीत वीजपुरवठा होणार आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.- युवराज जरग, अधीक्षक अभियंता, महावितरण