Pune Junglee Maharaj Road: पाऊस पडायला लागल्यानंतर महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, सरकार यांची पोलखोल होण्यास सुरू होते. जनतेसाठी जनतेच्या पैशांतून बांधलेले रस्ते किती तकलादू आहेत किंवा किती दर्जेदार आहेत, याची तपासणी करण्याचा ऋतू म्हणजे पावसाळा. कोट्यवधी रुपये खर्च करूनही केवळ भ्रष्टाचार आणि इच्छाशक्तीच्या अभाव असल्यामुळे रस्ते उखडतात. अपघात होतात आणि ज्यांच्यासाठी ते बांधलेत, ती सामान्य जनता रस्त्यावर मृत्यूमुखी पडते. पण ५० वर्षांपूर्वी बांधलेला एक रस्ता आजही सुस्थितीत आहे, असे जर सांगितले तर कुणालाही विश्वास बसणार नाही. पुण्यात असा रस्ता आहे, जो आजही तसाच आहे.
पुण्यातील जंगली महाराज रस्ता आता वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतो. पुण्याच्या मध्यवर्ती भागात अवघ्या २.५ किमींचा हा रस्ता जंगली महाराज मंदिरापासून ते डेक्कन जिमखाना परिसरापर्यंत जातो. पुण्यात जेएम रोड या नावाने तो जास्त परिचित आहे. या रस्त्याचे काम इतके दर्जेदार करण्यात आले की, देशभरात त्याचा आदर्श घेतला गेला.
१ जानेवारी १९७६ रोजी वाहतुकीसाठी खुला झालेला हा रस्ता आजही अव्याहतपणे सुरू आहे. रस्ता दर्जेदार आहेच, पण त्याच्या निर्मितीची कथाही तेवढीच रोचक आहे.
दुष्काळ, अतिवृष्टी आणि खड्डेमुक्त रस्ता बांधण्याचा चंग
१९७२ साली राज्यात तीव्र दुष्काळ पडला होता आणि त्याच्या पुढच्याच वर्षी मुसळधार पाऊस झाला. या पावसात पुण्याची वाताहत झाली. रस्ते उखडले गेले, जागोजागी खड्डे झाले. पुणे महानगरपालिकेतील तत्कालीन २१ वर्षीय नगरसेवक आणि स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीकांत शिरोळे यांनी शहर अभियंत्यांना याचा जाब विचारला. मुंबईत जास्त पाऊस पडतो, पण तिथे इतकी गंभीर परिस्थिती का नाही? असा प्रश्न शिरोळे यांनी विचारला.
शिरोळे यांनी २०२२ साली द इंडियन एक्सप्रेसशी याबाबत संवाद साधला होता. ते म्हणाले, “शहर अभियंत्यांनी तेव्हा मला सांगितले की, मुंबईत रिकॉन्डो नावाची कंपनी पारशी बंधू चालवतात. त्यांच्याकडे हॉट मिक्स नावाचे तंत्रज्ञान होते. या तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबईतील रस्ते बांधले जातात. ” शिरोळे पुढे म्हणाले, मी मुंबईला जाऊन रिकॉन्डो कंपनीचे कार्यालय गाठले आणि त्यांना पुण्यात येण्याची विनंती केली.
श्रीकांत शिरोळे यांनी सांगितले की, मी स्थायी समितीचा अध्यक्ष असताना रिकॉन्डो बंधूंना जंगली महाराज रस्त्याचे काम दिले. जर तुम्हाला चांगले काही हवे असेल तर त्याची निविदा काढली जात नाही. आम्ही निविदा न काढता रस्त्याचे काम दिले. तसेच दहा वर्षांपर्यंत रस्त्यावर खड्डा होणार नाही. तसे काही झाल्यास कंपनी मोफत दुरूस्ती करून देईल, अशी लेखी हमीही घेतली.
शिरोळे यांनी पुढे सांगितले, १ जानेवारी १९७६ रोजी रस्त्याचे लोकार्पण झाले. ३१ डिसेंबर १९८५ रोजी त्याची मुदत संपली. तरीही रस्ता अतिशय उत्तम स्थितीत होता. आता या घटनेला ५० वर्ष उलटून गेली आहेत. या काळात थोडी फार डागडुजी करून हा रस्ता जसाच्या तसा आहे.
१५ लाखात अडीच किमीची रस्ता
जंगली महाराज रस्त्याच्या कामासाठी त्यावेळी १५ लाख रुपये देण्यात आले होते. रस्त्याच्या कामाचा कालावधी पाहिला तर त्यावेळी सोन्याचा दर २०० रुपये प्रति तोळा (आज सोन्याचा दर प्रति तोळा १ लाखांच्या पुढे आहे) होता. तर पेट्रोल ८० पैसे प्रति लीटर होते. यावरून रस्त्याच्या बजेटचा अंदाज येऊ शकतो.
रिकॉन्डो कंत्राटदारांना पुढे काम का मिळाले नाही?
देशात नावाजला गेलेला रस्ता बांधणारे कंत्राटदार रिकॉन्डो बंधू यांनी इतका दर्जेदार रस्ता बांधूनही त्यांना पुण्यात पुन्हा काम मिळाले नाही. श्रीकांत शिरोळे यांनी २०२२ रोजी एबीपी माझाशी संवाद साधताना रिकॉन्डो बंधूविषयी माहिती दिली. ते म्हणाले, १९८५ पर्यंत खड्डा पडतो की नाही, याची वाट पुणेकर पाहत राहिले. त्यामुळे रिकॉन्डो यांना पुढचे काम दिले गेले नाही. पुढे दहा वर्षात पुण्याचे राजकारणही बदलले होते. आम्ही टक्केवारी खाल्ली नाही, म्हणून हा रस्ता इतका चांगला झाल्याचे शिरोळे म्हणाले.
रिकॉन्डो कंपनीचे पुढे काय झाले?
रिकॉन्डो बंधूंनी एकत्र येत जंगली महाराज रस्त्याचे काम केले होते. रिकॉन्डो डेव्हलपर्स अँड कॉट्रँक्टर्स प्रा. लि. या नावाने १९८७ साली खासगी कंपनीची नोंदणी झाल्याची माहिती झुबाकॉर्प संकेतस्थळावर मिळते. सध्या ही कंपनी अस्तित्त्वात नसल्याचेही तिथूनच कळते. सोशल मीडियावर मात्र रिकॉन्डो कंत्राटदार आणि जंगली महाराज रस्त्याबाबत अनेकदा चर्चा होत असते. सोशल मीडियावरील चर्चेनुसार रिकॉन्डो बंधूमध्ये झालेल्या वादानंतर दोघेही वेगळे झाले होते. त्यानंतर त्यांनी मोठे काम घेतल्याच्या नोंदी आढळत नाहीत.