पुणे : कोथरूड भागातील राहुलनगर सोसायटीत रविवारी पहाटे शिरलेल्या चोरट्यांनी सदनिकेत शिरून एका रहिवाशावर हल्ला केला. चोरट्यांनी रहिवाशाच्या डोक्यात गज मारल्याने तो गंभीर जखमी झाला.

या घटनेत रहिवासी गंभीर जखमी झाला. रहिवाशाने याबाबत अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड भागातील महर्षी कर्वे पुतळ्यासमोर राहुलनगर सोसायटी आहे. चोरटे रविवारी (२८ सप्टेंबर) पहाटे पावणेचारच्या सुमारास सोसायटीच्या आवारात शिरले. चोरट्यांनी संबंधित रहिवाशाच्या सदनिकेचा दरवाजा ठोठावला. दरवाजा बंद होता. त्यामुळे सदनिकेत कोणी नसल्याचे चोरट्यांना वाटले.

दरम्यान, दरवाजा ठोठावल्यानंतर रहिवाशाने दरवाजा उघडला. चाेरटे आतमध्ये शिरले आणि त्यांनी रहिवाशाला धमकावले. रहिवाशाने चोरट्यांना विरोध केला. चोरट्यांशी त्यांची झटापट झाली. चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात लोखंडी गज घातला. त्यात ते गंभीर जखमी झाले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

त्यानंतर चोरट्यांनी शयनगृहातील कपाट उचकटून ७० हजारांचे दागिने लुटले. आरडाओरडा केल्यास जिवे मारण्याची धमकी देऊन चोरटे पसार झाले. जखमी अवस्थेतील रहिवाशाने या घटनेची माहिती पाेलिसांना दिली. माहिती मिळताच सहायक आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित तपास करत आहेत.