पुणे : ‘कोरेगाव पार्क येथील जमीन व्यवहारात एक रुपयाचाही व्यवहार झालेला नाही. विक्रेत्याला कोणतेही पैसे दिलेले नाहीत. जमिनीचा ताबा घेतलेला नाही. मात्र, खरेदीखत करायला नको होते. ते कसे केले माहिती नाही. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर सत्य बाहेर येईल,’ अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) पक्ष कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठका घेतल्या. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

पार्थ पवार यांच्या कंपनीला मुद्रांक शुल्क भरावे लागणार का, याबाबत विचारणा करण्यात आली असता, पवार म्हणाले, ‘हा व्यवहार झाला नाही. खरेदीखत करायला नको होते. कसे केले माहिती नाही. या प्रकरणात कोणीही असले, तरी त्याची योग्य चौकशी झाली पाहिजे. समिती नेमली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर खरे काय ते बाहेर येईल. मला हा व्यवहार झालेला माहीत नव्हता. मी व्यवहार करू दिला नसता.’‘जमीन खरेदी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. एका महिन्यात चौकशीनंतर ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ होईल,’ असेही पवार म्हणाले.

‘बोपोडी जमीन प्रकरणात आमच्या कुटुंबाचा काही संबंध नाही, उगाच आमची बदनामी करू नका,’ असेही सुनावले.
‘निवडणूक आली, की माझ्यावर यापूर्वीही अनेक आरोप झाले. त्यामधून काही सिद्ध झाले नाही. पण, बदनामी प्रचंड झाली. अशा प्रकारचे व्यवहार पुन्हा होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याबाबत सूचना समितीला केली आहे. वादग्रस्त दस्तनोंदणीप्रकरणी कोणी फोन केला का, कोणी दबाव आणला का, याचाही तपास होईल.’ असे पवार यांनी स्पष्ट केले.

‘वकिलामार्फत तपासणी करायला हवी होती’

‘आम्ही कोणताही व्यवहार करतो त्या वेळी त्याबाबतची सर्व कागदपत्रे वकिलांमार्फत तपासायला सांगतो. त्यांच्या सल्ल्यानंतरच आम्ही पुढे जातो. जमिनीबाबत नोटीस देऊन काही म्हणणे आहे का, याची माहिती घेतली जाते. मात्र, या प्रकरणात असे काहीच झालेले नाही. दुय्यम निबंधकाने अशा प्रकारचे दस्त आल्यानंतर नोंदणी करायला नको होती,’ असेही पवार यांनी सांगितले.

पार्थला सल्ला देणार

‘माझ्या जवळचे, लांबचे कोणीही नातेवाईक चुकीचे व्यवहार करीत असल्यास दबावाला घाबरू नका, असे प्रशासनाला सांगितले आहे. पार्थला मुंबईत गेल्यावर अशा प्रकरणातून शिकण्याचा सल्ला देणार आहे. अशा प्रकरणात अभ्यासू, तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेण्याचा सल्ला देणार आहे,’ असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.