पुणे महापालिका निवडणुकीला अद्याप मुहूर्त लागलेला नसला, तरी पुण्यात एकाच सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहिलेल्या दोन नेत्यांमध्ये होर्डिंग वॉर सुरू आहे. माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस एकाच दिवशी असल्यानं पुण्यात होर्डिंग वॉर रंगलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस २२ जुलै रोजी असतो. त्यानिमित्ताने दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांकडून होर्डिंग लावण्यात आल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुकीचं वर्ष लक्षात घेता, भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांचे ‘विकासपुरुष’ म्हणून होर्डिंग लावले गेले; या होर्डिंग्जला राष्ट्रवादी काँग्रेसने ‘कारभारी लयभारी’ने उत्तर दिलं आहे. या पोस्टर वॉरची शहरभर चर्चा रंगली आहे.

पुणे शहरात मागील तीन चार दिवसांपासून भाजपाकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरभर विकासपुरुष या मथळ्याखाली फ्लेक्स लावले जात आहेत. या फ्लेक्सबाजीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपाला सुनावलं. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना तोंडही फुटलं. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर शाब्दिक हल्ले केले जात असून, आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून २२ जुलै रोजी अजित पवार यांचा देखील वाढदिवस असल्याने भाजपाच्या फ्लेक्सबाजीला ‘कारभारी लयभारी’ने उत्तर देण्यात आले आहे.

दोन्ही पक्षांनी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी होर्डिंग लावल्या आहेत. या होर्डिंगची शहरातील राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. होर्डिंगवरून भाजपा-राष्ट्रवादी आमने-सामने आल्यानं हा महापालिका निवडणुकीपूर्वीचा ट्रेलर तर नाही ना? अशी चर्चा होत आहे. आगामी महापालिका निवडणुकीतदेखील असाच राजकीय धुरळा उडण्याची चिन्ह यानिमित्ताने दिसत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune latest news ajit pawar devendra fadnavis birthday hoarding pune politics bmh 90 svk
First published on: 20-07-2021 at 18:15 IST