पुणे : क्रिप्टो म्हणजेच आभासी चलन गुंतवणुकीत पुण्याने पाचवा क्रमांक राखला आहे. देशातील एकूण आभासी चलन गुंतवणुकीत पुण्याचा वाटा ४ टक्क्यांवर पोहोचला आहे. याच वेळी प्रमुख १० शहरांमध्ये जास्त परतावा मिळविण्यातही पुण्यातील आभासी चलन गुंतवणूकदार यशस्वी ठरल्याचे ‘कॉइनस्विच’ या आभासी चलन मंचाच्या अहवालातून समोर आले आहे.
‘कॉइनस्विच’ने ‘इंडियाज् क्रिप्टो पोर्टफोलिओ २०२५’ हा अहवाल जाहीर केला आहे. देशातील वैविध्यपूर्ण आभासी चलन परिसंस्था आणि डिजिटल मालमत्तेत वाढत असलेला सहभाग यावर या अहवालातून प्रकाश टाकला आहे. या अहवालानुसार, देशातील प्रमुख १० शहरांमध्ये आभासी चलन गुंतवणुकीत पुणे पाचव्या स्थानी आहे. गेल्या वर्षीही पुण्याचे स्थान पाचवे होते. पुण्यातील सर्वाधिक ३५.४५ टक्के गुंतवणूकदारांनी लार्ज कॅपला पसंती दिली आहे. त्या खालोखाल ब्ल्यू चिप २९.२१ टक्के, मिड कॅप २९.४१ टक्के आणि स्मॉल कॅप ५.९३ टक्के असे प्रमाण आहे. पुण्यातील ६९.०५ टक्के गुंतवणूकदार फायद्यात आहेत.
देशातील आभासी चलन गुंतवणुकीत दिल्ली, बंगळुरू आणि मुंबई या शहरांचे वर्चस्व आहे. या शहरांचा क्रिप्टो गुंतवणुकीत वाटा अनुक्रमे १४.६ टक्के, ६.८ टक्के आणि ५.२ टक्के आहे. त्यानंतर हैदराबाद ४.६ टक्के गुंतणुकीसह चौथ्या स्थानी आणि पुणे पाचव्या स्थानी आहे. या यादीत जयपूर सहाव्या स्थानी, कोलकता सातव्या, लखनौ आठव्या, पाटणा नवव्या आणि चेन्नई दहाव्या स्थानी आहे. गुंतवणूकदारांचे प्राधान्य बिटकॉइन, डॉजकॉईन आणि इथरिअमला असून, हे प्रमाण अनुक्रमे ६.५ टक्के, ६.४९ टक्के आणि ५.२ टक्के आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
३५ वर्षांखालील गुंतवणूकदार जास्त
देशातील आभासी चलन गुंतवणुकीत ३५ वर्षांखालील गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर सक्रिय असून, एकूण गुंतवणूकदारांपैकी ७१.७ टक्के याच वयोगटातील आहेत. यात २६ ते ३५ वयोगटातील ४४.५ टक्के गुंतवणूकदार आणि १८ ते २५ वयोगटातील २७.३ टक्के गुंतवणूकदार आहेत. गुंतवणूकदारांमध्ये महिलांचे प्रमाण तुलनेने कमी असून, एकूण गुंतवणूकदारांपैकी केवळ १२.०२ टक्के महिला असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
देशातील आभासी चलन गुंतवणूक (टक्क्यांमध्ये)
दिल्ली – १४.६
बंगळुरू – ६.८
मुंबई – ५.२
हैदराबाद – ४.६
पुणे – ४
जयपूर – ३.२
कोलकता – ३.२
लखनौ – ३
पाटणा – २.६
चेन्नई – २.५
इतर – ५०.३
देशातील मध्यवर्ती गुंतवणुकीत आभासी चलनाचा समावेश होताना दिसत आहे. गुंतवणूक वाढण्यासोबत परतावा मिळविणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या वाढत आहे. यातून आभासी चलन गुंतवणुकीची परिसंस्था निर्माण होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.- बालाजी श्रीहरी, उपाध्यक्ष, कॉइनस्विच