पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपने उमेदवार जाहीर करून प्रचाराला आरंभ केला असताना अद्यापही काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत धूसफूस असल्याने उमेदवार निश्चित होऊ शकलेला नाही. आगामी निवडणुकीत त्याचे पडसाद उमटणार असल्याचे उशिरा का लक्षात आल्याने काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते मंडळी आता कामाला लागली आहे. त्यामुळे २० जणांची इच्छुकांची यादी आता कमी करून शहर पातळीवर तीन नावे निश्चित केली आहेत. माजी आमदार मोहन जोशी, कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर आणि माजी उपमहापौर आबा बागुल यापैकी कोणताही एक उमेदवार निवडा, अशी भूमिका शहरातील पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे इतर मागासवर्गाला (ओबीसी) संधी मिळणार की अनुभवी उमेदवाराला, याबाबतचा तिढा सोडविण्यासाठी आता प्रदेश पातळीवर निर्णय सोपविण्यात आला आहे.
भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी जाहीर करून सुरुवातीलाच प्रचारात आघाडी घेतली आहे. मोहोळ यांनी गाठीभेटी आणि बैठकांचा सपाटा लावलेला असताना काँग्रेसमध्ये अद्याप उमेदवार कोण यावरूनच वाद सुरू असल्याचे चित्र आहे. ही बाब लक्षात घेऊन काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी पुढाकार घेत समन्वय साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काँग्रेसच्या इच्छुकांची २० जणांची लांबलचक यादी आहे. त्यातील प्रत्येकाशी वैयक्तिक चर्चा शहरातील ज्येष्ठ नेत्यांनी सुरू केली आहे. त्यात यश येऊन आता तीन नावांवर ही यादी थांबली असल्याचे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात आले.
हेही वाचा – मिरजेतील उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार
माजी आमदार मोहन जोशी, कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर आणि माजी उपमहापौर आबा बागुल यांपैकी एक नाव निश्चित करून अंतिम निर्णय येत्या दोन दिवसांत घ्यावा, अशी विनंती काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून प्रदेश पातळीवर करण्यात आली असल्याचे समजते. त्यामुळे उमेदवारीचा हा तिढा सोडवण्याचे काम आता प्रदेश पातळीवरून होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा – साताऱ्यात उदयनराजे यांना महायुतीतूनच विरोध
भाजपाने मराठा उमेदवार दिला असल्याने काँग्रेसकडून ओबीसी उमेदवार देण्याबाबत चाचणी सुरू आहे. तीन नावांपैकी धंगेकर आणि बागुल हे दोघेही ओबीसी प्रवर्गातील आहेत. धंगेकर हे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमुळे पुणेकरांच्या चांगल्याच परिचयाचे झाले आहेत. त्यांचा कसब्यातील करिष्मा शहरात लागू होण्याची शक्यता गृहीत धरून काँग्रेसकडून त्यांच्या नावाला पसंती देण्यात येत आहे. मात्र, त्यांच्यापेक्षा माजी आमदार मोहन जोशी यांचा निवडणुकांचा अनुभव दांडगा आहे. यापूर्वी त्यांनी दोन वेळा लोकसभा निवडणूक लढवली आहे. १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत जोशी यांना दोन लाख १३ हजार मते मिळाली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जोशी यांना तीन लाख मतदारांनी मते दिली होती. त्यामुळे अनुभवाला संधी मिळणार की लोकप्रियतेला, याबाबतचा निर्णय आता काँग्रेसच्या प्रदेश पातळीवर घेतला जाणार आहे.
हेही वाचा – अशोक चव्हाण – डॉ. माधव किन्हाळकर तब्बल २५ वर्षांनंतर एकत्र!
माजी उपमहापौर आबा बागुल हेदेखील ओबीसी प्रवर्गातील आहेत. पुण्यात ओबीसी मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. बागुल यांनी पुणे महापालिकेत सलग पाच वेळा नगरसेवक म्हणून काम केले आहे. नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवण्यासाठी बागुल हे पुण्यात प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांचे नाव पहिल्या तीन इच्छुकांमध्ये आले असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.
वसंत मोरे यांना विरोध
मनसेचा राजीनामा दिलेले माजी नगरसेवक वसंत मोरे हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेऊन प्रयत्न केला आहे. मात्र, पुणे लोकसभेची जागा ही महाविकास आघाडीत काँग्रेसकडे आहे. मोरे हे काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्यासाठीही प्रयत्नशील आहेत. मात्र काँग्रेसमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांचा त्यांना विरोध आहे. त्यामुळे मोरे यांची अडचण झाली आहे.