पुणे : अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याप्रकरणी नुकसान भरपाईसाठी मोटार अपघात न्याय प्राधिकरणात दाखल झालेला दावा समुपदेशनानंतर निकाली काढण्यात आला. वाघोलीतील लोणी कंद-बकोरी गाव रस्त्यावर एका दुचाकीस्वाराला एप्रिल २०२३ मध्ये भरधाव टेम्पोने धडक दिली होती. अपघातातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी लोणी कंद पोलीस ठाण्यात टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराच्या मागे पत्नी, दोन मुले, आई-वडील असा परिवार आहे. टेम्पोचालकाने विमा उतरविला होता. संबंधित विमा कंपनीविरुद्ध एक कोटी रुपये नुकसान भरपाईसाठी दावा दुचाकीस्वाराच्या कुटुंबीयांनी दाखल केला. कुटुंबीयांच्या वतीने ॲड. समीर सय्यद आणि ॲड. वी. ए. ब्राह्मणकर यांनी दावा दाखल केला होता.

त्यानंतर दावा मध्यस्थीसाठी ॲड. अतुल गुंजाळ यांच्याकडे पाठविण्यात आला. दावा चालवून निकाली लागण्यास वेळ लागेल. तसेच उच्च न्यायालयात अपील केल्यानंतर आणखी पाच ते दहा वर्षांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे, असे ॲड. गुंजाळ यांनी कुटुंबीयांना सांगितले.

आदेशानंतर रकमेवर व्याज द्यावे लागेल, हे विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविल्यानंतर दावा निकाली निघाला. रकमेचा धनादेश प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन आणि पुणे विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश सोनल पाटील यांच्या हस्ते अर्जदारांना देण्यात आला.