पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पंकज देवरे यांनी ‘पीएमपी’ची आर्थिक तूट कमी करण्यासाठी ‘खारीचा वाटा’ म्हणून कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहा कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्यांच्या वेतनातून दोन हजार रुपये आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनातून एक हजार रुपये महामंडळाप्रति दायित्व म्हणून वेतनातून वजावट करण्याचा आदेश देवरे यांनी दिल्याने कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील ‘जीवनवाहिनी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘पीएमपी’ची गेल्या काही वर्षांपासून संचलन तूट वाढत चालली आहे. ती कमी करण्यासाठी आर्थिक उत्पन्नवाढीचे प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार पीएमपीच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून महामंडळाप्रति दायित्व आणि सार्वजनिक उपक्रमात ‘खारीचा वाटा’ म्हणून वर्ग एक आणि दोनमधील अधिकाऱ्यांकडून प्रतिमहिना दोन हजार रुपये आणि वर्ग तीन आणि चारमधील कर्मचाऱ्यांकडून प्रतिमहिना एक हजार रुपये वेतनाची वजावट करण्याबाबतचा आदेश पीएमपीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. पीएमपी राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेने या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

इंटक आणि प्रशासन यांनी संगनमताने हा निर्णय घेतला आहे. मात्र, हा निर्णय घेताना सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणे अपेक्षित होते. कामगार कायद्यानुसार कोणत्याही कामगाराच्या पगारातून निधी वजावट करण्यापूर्वी त्याची परवानगी घेणे बंधनकारक आहे. कायदेशीर तरतुदीशिवाय कोणताही निधी वजावट केल्यास न्यायालयात दाद मागितली जाईल.- सुनील नलावडे, सरचिटणीस, पीएमपी राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार संघटना

माझ्या वेतनातून परवानगीशिवाय कोणतीही कपात करण्यात येऊ नये. मी माझे वेतन कोणलाही कपात करण्यासंदर्भात संमती दिलेली नाही.- अमोल आल्हाट, वाहक, पीएमपी