पुणे : राज्य मंडळाच्या दहावीच्या निकालात राज्यात इंग्रजी माध्यमाचा निकाल सर्वाधिक ९८.४४ टक्के लागला आहे. तर सर्वाधिक विद्यार्थी असलेल्या मराठी माध्यमाचे ९२.८५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्य मंडळातर्फे एकूण आठ माध्यमांमध्ये परीक्षा घेतली जाते. त्यानुसार मराठी माध्यमातून १६ हजार ५३४ शाळांतील १० लाख ७६ हजार ४३१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या १० लाख ६६ हजार ९०० विद्यार्थ्यांपैकी ९ लाख ९० हजार ६१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर इंग्रजी माध्यमाच्या ४ हजार ३१९ शाळांतून नोंदणी केलेल्या ३ लाख ५१ हजार ९५९ विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ५१ हजार ९५९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ३ लाख ४५ हजार ९६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्या खालोखाल उर्दू माध्यमाच्या १ हजार ३०४ शाळांतून ८८ हजार ५२३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परीक्षा दिलेल्या ८७ हजार ७७३ विद्यार्थ्यांपैकी ८१ हजार १४९, म्हणजेच ९३.५९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती राज्य मंडळाने दिली.
हिंदी माध्यमाचा निकाल ९०.४८ टक्के लागला. ६१२ शाळांतून नोंदणी केलेल्या ३७ हजार २५ विद्यार्थ्यांपैकी ३६ हजार ४८४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ३३ हजार १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कन्नड माध्यमाच्या ७८ शाळांतील २ हजार ६१४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परीक्षा दिलेल्या २ हजार ५४६ विद्यार्थ्यांपैकी ९१.५२ टक्के, २ हजार ३३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गुजराती माध्यमाच्या ४६ शाळांतून नोंदणी केलेल्या १ हजार ३१६ विद्यार्थ्यांपैकी १ हजार २९४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर १ हजार २२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गुजराती माध्यमाचा निकाल ९४.४४ टक्के लागला. तेलुगू माध्यमाचे ९६.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पाच शाळांतून नोंदणी केलेल्या १२९ विद्यार्थ्यांपैकी १२८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर १२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सिंधी माध्यमाचा निकाल ८२.६१ टक्के लागला. एका शाळेतून परीक्षा दिलेल्या २३ विद्यार्थ्यांपैकी १९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.