पिंपरी- चिंचवड : पुण्याच्या तळेगाव-म्हाळुंगे रस्त्यावर भीषण अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी पावणे सात च्या सुमारास घडली आहे. घटनेचा सीसीटीव्ही समोर आला असून अपघाताची तीव्रता पाहायला मिळते. गजानन बाबुराव बोळकेकर अस मृत्यू झालेल्या तरुणाच नाव आहे. दुचाकी चालक आदित्य गायकवाड हा अपघातात जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गजानन बोळकेकर हा पानसे ऑटो कॉम या कंपनीमध्ये गेल्या दीड वर्षांपासून काम करत होता. आज सकाळी कंपनीत जाण्यासाठी उशीर होत असल्याने दुचाकीवरील व्यक्तीला लिफ्ट मागितली. पण, हीच लिफ्ट जीवघेणी आणि शेवटीची ठरेल अस गजाननला वाटलं नव्हतं. तळेगाव म्हाळुंगे रस्त्यावरील खालुम्ब्रे येथे रस्ता निसरडा होता.
दुचाकी चालक आदित्य, भरधाव कंटेनरला ओव्हरटेक करत होता. तेव्हाच घात झाला आणि दुचाकीच पुढील चाक घसरल. शेजारून भरधाव वेगात जाणारे कंटेनरला धक्का लागला आणि दुचाकीवरील गजानन पाठीमागील चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला. कंटेनर चालकाला कळायच्या आधीच हे सर्व घडलं होत. गजनन हा कंपनीत एचआर होता. तीन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. गजनन हा मूळ बोकडा, तालुका कंधार जिल्हा नांदेड येथील आहे. घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. कंटेनर चालक मोहम्मद खानला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.