Rohit Pawar alleged financial fraud on Pune Market Committee : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत रोजंदारीवरील कर्मचारी कायम करणे, गाळे आणि परवान्यांचे वाटप, सुरक्षा रक्षकांच्या एजन्सीच्या नावावर बनावट बिले देऊन सुमारे २०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा वापर केला जात असल्याने त्यांनी स्पष्टीकरण द्यावे, आव्हान पवार यांनी दिले आहे.

या बाजार समितीतील गैरव्यवहार प्रकरणात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी गैरव्यवहार प्रकरणी मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर रोहित पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बाजार समितीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला.

रोहित पवार म्हणाले. ‘बाजार समितीत हजारो बनावट परवाने देऊन शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. प्रत्यक्ष परवानाधारक ९०० ते १००० आहेत. मात्र, ४००० बनावट परवाने देण्यात आले. जी-५६ मधील ५६ जागा काही संचालकांनी बेकायदा ताब्यात घेतल्या. जा जागा भाड्याने दिल्या. मार्केटयार्ड फूल बाजारातील गाळ्यांचे वाटपही बेकायदा पद्धतीने करण्यात आले असून, अनेक गाळे बाजार समितीच्या संचालकांनी नातेवाईकांना बेकायदा दिले आहेत.’

‘रोजंदारी पद्धतीने काम करणारे कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांच्या एजन्सीच्या नावावर बनावट बिले सादर करुन अपहार केला जात आहे. वाहनतळाच्या नावाखाली शेतकरी आणि वाहतूकदारांची लूट केली जात आहे. अधिकृत पावती फक्त दहा रुपयांची दिली जाते, मात्र, प्रत्यक्षात २०० ते ३०० रुपयांपर्यंत रक्कम वसूल केली जाते. या प्रकारामुळे शेतकरी, वाहतूकदार आणि कामगार वर्ग अडचणीत सापडला आहे.’ असाही आरोप पवार यांनी केला.

‘शेतकऱ्यांच्या हक्काचा पैशांचा गैरवापर करणाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा वापर केला जात आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. बाजार समितीत होणारी शेतकऱ्यांची लूट थांबविली पाहिजे. शासनाने या सर्व प्रकरणाची तातडीने चौकशी करून जबाबदार संचालकांवर कठोर कारवाई करावी’ अशी मागणी पवार यांनी केली.

‘देणगीचे ऋण फेडता का?’

‘राज्य शासनाने एका कंपनीला ९४ कोटी रुपयांचा दंड केला होता. तो दंड १७ लाखांपर्यंत कमी केला. संबंधित उद्योग समूहाचा दंड एवढ्या मोठ्या प्रमाणावर माफ करण्याचे कारण काय? राज्य शासन ‘इलेक्टोरल बाँड’च्या देणगीचे ऋण फेडते का?’ असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित करुन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना टोला लगावला.

पवार यांचे आरोप फेटाळले

‘पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न १०६ कोटी रुपये आहे. त्यापैकी ६० कोटी रुपये कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात खर्ची पडतात. अन्य खर्च वजा करता ३० ते ३५ कोटी रुपये शिल्लक राहतात. असे असताना २०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार कसा झाला?’ असा प्रश्न पुणे कृषी बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप यांनी केला. ‘पवार यांना कोणीतरी चुकीची माहिती देत आहे. याबाबत त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करण्यास तयार आहे.’ असे सांगत जगताप यांनी पवार केलेले आरोप फेटाळले.