पुणे : पुण्यातील वीजवितरण क्षेत्रात टाटा पॉवर कंपनीही उतरणार आहे. कंपनीने वीज नियामक आयोगाकडे अर्ज केला असून, अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे, अशी माहिती टाटा पॉवरचे मुख्याधिकारी व व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रवीर सिन्हा यांनी बुधवारी दिली.

टाटा पॉवरने राज्यात वीजवितरण परवान्यासाठी वीज नियामक आयोगाकडे अर्ज केला आहे. त्यात मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकचा समावेश आहे. याबाबत सिन्हा म्हणाले, ‘कंपनीने नियामक आयोगाकडे वीज वितरण परवान्यासाठी अर्ज केला आहे. पुण्यासह आजूबाजूच्या परिसरात वीजपुरवठा करण्याचा प्रस्ताव आहे. याबाबत नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. कंपनीचा हा प्रस्ताव नियामकांकडे अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. ही मंजुरी मिळाल्यानंतर कंपनी वीजवितरण सुरू करेल.’

टाटा पॉवरने स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष योजना जाहीर केली आहे. या विषयी सिन्हा म्हणाले, ‘आमच्या नव्या योजनेत ग्राहकांना सुरुवातीला केवळ १ हजार ९४७ रुपये भरून सौरप्रणालीचे मालक होता येईल. भारताच्या स्वातंत्र्याच्या वर्षाचे प्रतीक म्हणून ही योजना आणण्यात आली असून, त्यातून ग्राहकांना वाढत्या वीज देयकापासून स्वातंत्र्य मिळेल. कंपनीकडून सौर प्रणालीच्या खरेदीसाठी १०० टक्के कर्जसुविधा उपलब्ध करून दिली जाईल. ग्राहकांना या योजनेत सरकारी अंशदानाच्या लाभासह परवडणारे हप्तेही दिले जातील.’

पुण्यात वाहतूक कोंडीसह प्रदूषण

पुण्यात वाहतूक कोंडीसह प्रदूषणाची समस्या वाढल्याकडे सिन्हा यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, ‘पुण्यात वाहतूक कोंडी वाढल्यामुळे प्रदूषणाच्या समस्येत वाढ झाली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी हरित इंधन पर्यायांचा अधिकाधिक वापर करणे गरजेचे आहे. वातावरण बदलामुळे अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. त्यावरही मात करण्यासाठी हरित इंधन पर्याय उपयोगी ठरणार आहेत.’