पिंपरी : मेट्रोचे काम सुरू असल्याने निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प ते चिचवड स्टेशनपर्यंतच्या खड्डेमय झालेल्या सेवा रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अखेर पुणे महामेट्रो व्यवस्थापनाकडून हाती घेण्यात आले आहे. रस्त्यावर डांबरीकरण केले जात आहे. त्यामुळे हा रस्ता खड्डेमुक्त होणार आहे.

पिंपरी ते निगडी मेट्रो विस्तारीत मार्गिकचे काम सुरू आहे. त्यासाठी निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक ते चिंचवडच्या एम्पायर इस्टेटपर्यंतचा सेवा रस्ता आणि बीआरटी मार्ग महापालिकेने महामेट्रोकडे हस्तांतरित केला आहे. त्या रस्त्याचे अंतर ४.५ किलोमीटर इतके आहे. या रस्त्याची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी महामेट्रोकडे देण्यात आली आहे. सध्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक ते चिंचवड स्टेशनपर्यंत मेट्रोचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्ता, बीआरटी मार्ग खोदून खांबाची उभारणी, ‘व्हायाडक्ट’चे काम सुरू आहे.

विनाअडथळा काम करता यावे, यासाठी महामेट्रोने या मार्गावर सुरक्षा कठडे (बॅरिकेट्स) लावले आहेत. त्यामुळे सेवा रस्ता प्रचंड अरुंद झाला आहे. पदपथ उखडून तेथे रस्ता केला आहे. अरुंद झालेला रस्ता, वाहनांची मोठी वर्दळ आणि पावसामुळे काँक्रीटचा रस्ता, डांबरी रस्ता, पदपथावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. वर्दळीच्या वेळेत वाहतूक संथ होऊन वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागत होत्या. खड्डे दुरुस्तीबाबत महापालिकेने महामेट्रोला तीन वेळा पत्र पाठविले. मात्र, त्याला महामेट्रो व्यवस्थापनाने प्रतिसाद दिला नाही.

रोष वाढत असल्याने अखेर महामेट्रोने रस्ते पक्के करून देण्याची तयारी दर्शविली. त्यासाठी या रस्त्यावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने काही काळ बंद ठेवून इतरत्र वळविण्याची मागणी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी केली होती. त्यानुसार वाहतूक पोलीस व महापालिकेने काही रस्त्यावरील वाहतूक वळवली. त्यानंतर महामेट्रोने रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. निगडी ते चिंचवड स्टेशन रस्त्याचे डांबरीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पावसाने उघडीप दिल्याने दुरुस्तीचे काम करण्यात आल्याचे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सेवा रस्त्याच्या दुरुस्तीबाबत मेट्रो प्रशासनाला पत्रव्यवहार केला होता. पाऊस उघडल्याने मेट्रोने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. रस्त्यावर डांबरीकरण करण्यात येत आहे. वेगात काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत, महापालिकेचे सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी सांगितले.