पुणे : शहरातील डेंग्यूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. या वर्षात डेंग्यूच्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची प्रथम नोंद महापालिकेने १८ जुलैला केली. प्रत्यक्षात या रुग्णाचा १५ मे रोजी मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पुण्यातील खासगी रुग्णालयात डेंग्यूमुळे झालेल्या मृत्यूची नोंद करण्यास महापालिकेला दोन महिन्यांचा कालावधी लागला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेतील सावळा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे.
पूना हॉस्पिटलमध्ये एका ७६ वर्षांच्या रुग्णाचा १५ मे रोजी मृत्यू झाला. त्याची रुग्णालयाने अँटिजेन चाचणी केली होती. ती पॉझिटिव्ह आल्याने त्याचा नमुना तपासणीसाठी महापालिकेच्या नायडू संसर्ग रुग्णालयात २९ मे रोजी पाठविण्यात आला. या नमुन्याची एलायजा चाचणी नायडू रुग्णालयातील प्रयोगशाळेत करण्यात आली. त्यानंतर २ जूनला डेंग्यूचे निदान निष्पन्न झाल्याने त्याचा अहवाल महापालिकेच्या आरोग्य विभागाला पाठविण्यात आला. महापालिकेने प्रत्यक्षात १८ जुलैला डेंग्यूच्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद केली. नायडूतील चाचणीनंतर दीड महिन्याने महापालिकेने ही नोंद केली.
हेही वाचा – पिंपरी: पवना धरण ५१ टक्के भरले; पण पाणीपुरवठ्याच्या ‘या’ निर्णयात बदल नाही
नायडू रुग्णालयाकडून चाचणीचा अहवाल मिळण्यास उशीर झाल्याचा दावा महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी केला आहे. प्रत्यक्षात नायडू रुग्णालयातील सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या माहितीनुसार दोन जूनलाच हा चाचणी अहवाल महापालिकेकडे पाठविण्यात आला होता. याच वेळी पूना रुग्णालयाने नायडू रुग्णालयात रुग्णाचा नमुना पाठविण्यास एवढा विलंब का केला, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. याबाबतचे तपशील पूना रुग्णालयाकडे विचारले असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
साथरोग नियंत्रण कसे होणार?
पावसाळ्यात साथरोगांचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना केली जात असल्याचे आरोग्य यंत्रणांकडून दाखविले जाते. प्रत्यक्षात सरकारी यंत्रणांसोबत खासगी रुग्णालयांकडून लाल फितीचा कारभार सुरू असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. डेंग्यूचा संसर्ग झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याची नोंद होण्यास दोन महिने विलंब होत असेल, तर साथरोग नियंत्रण आरोग्य यंत्रणा कशा पद्धतीने करीत असतील, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
हेही वाचा – पुणे, पालघर, ठाणे, रायगडला आज ‘रेड ॲलर्ट’
डेंग्यूचा संसर्ग झालेल्या रुग्णाचा मृत्यू १५ मे रोजी झाला. त्याचा अहवाल आरोग्य विभागाला १८ जुलैला मिळाला आहे. या रुग्णाचा मृत्यू डेंग्यूमुळे झाला, की अन्य इतर कारणांमुळे याचा शोध राज्य सरकारची मृत्यू अन्वेषण समिती घेईल. – डॉ. सूर्यकांत देवकर, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका