पिंपरी : मद्याच्या नशेत वाहन चालवणाऱ्यांना केवळ शिक्षा नव्हे, तर समाजाप्रती जबाबदारीची जाणीव करून देणारा एक अनोखा निर्णय पुणे मोटर वाहन न्यायालयाने दिला आहे. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या एका चालकाला दहा हजार रुपयांच्या दंडासह एक हजार जनजागृती पत्रके वाटण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
हिंजवडी परिसरात २२ जुलै रोजी मद्यपान करून वाहन चालवणारा एक चालक वाहतूक पोलिसांच्या कारवाईत सापडला होता. या प्रकरणात मोटर वाहन कायदा कलमा अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने या चालकास दहा हजार रुपयांसाेबत मद्यपान करून वाहन चालवल्याने होणाऱ्या दुष्परिणामाबाबत एक हजार पत्रके तयार करून वाटण्याचा आदेश दिला आहे. ही पत्रके वाहतूक नियंत्रक दिवे (सिग्नल) येथे उभे राहून वाहनचालकांना वाटावी लागणार आहेत. हा दंड न भरल्यास वाहनचालकाला दहा दिवसांचा साधा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत दोन हजार ९८४ मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या चालकांवर न्यायालयात खटले दाखल केले आहेत.
या निर्णयाबद्दल पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील म्हणाले, ‘हा निर्णय केवळ दंडात्मक नाही, तर समाजोपयोगी आहे. या निर्णयाचा उद्देश गुन्हेगारास दंड देणे एवढाच नसून, समाजात जबाबदारीची भावना निर्माण करणे हाही आहे. मद्यपान करून वाहन चालवणे म्हणजे स्वतःच्याच नव्हे तर इतरांचाही जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईसाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे’.
