पिंपरी- चिंचवड : मद्यपान करून गाडी चालविणाऱ्या तरुणाला पुण्याच्या मोटार वाहन न्यायालयाने १० हजार दंड आणि एक हजार हॅण्डबिल्स छापून वाहतूक सिग्नलवर चालकांना वाटून कायद्याची माहिती देण्याची शिक्षा सुनावली आहे. त्याबाबतचा निकाल पुणे मोटार वाहन न्यायालयाने २७ ऑक्टोबर रोजी दिला आहे. २८ वर्षीय तरुण आज १० हजारांचा दंड भरणार असल्याची माहिती पिंपरी- चिंचवड वाहतूक पोलिसांनी दिली आहे.
मद्यपान करून वाहन चालवणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी करडी नजर आहे. शहरात जानेवारी २०२५ ते सप्टेंबर २०२५ पर्यंत दोन हजार ९८४ ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करून न्यायालयात गुन्हे (खटले) दाखल केले आहेत.
२२ जुलै २०२५ रोजी हिंजवडी वाहतूक विभागाच्या हद्दीत मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या २८ वर्षीय तरुणावर मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलमानुसार १८५ प्रमाणे न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याबाबतची सुनावणी नुकतीच २७ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडली.
न्यायदंडाधिकारी, मोटार वाहन न्यायालय पुणे यांनी २८ वर्षीय तरुणाला १० हजार रुपये दंड आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम २३ अन्वये मद्यपान करून गाडी चालविण्याचे दुष्परिणाम याबाबत एक हजार हॅण्डबिल्स छापून वाहतूक सिग्नलवर चालकांना वाटप करून कायद्याची माहिती देण्याची शिक्षा सुनावली आहे. अशी माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिली आहे.
