पुणे : वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे गुरुवारी (२२ मेे) मुळशी तालुक्यातील नेरे दत्तवाडी येथे महावितरणचे तीन वीजखांब कोसळल्याची घटना घडली. परिणामी, त्या परिसरातील सुमारे १८ घरांचा वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी भर पावसात दुरुस्तीचे काम केल्यानंतर तीन दिवसांनी या घरांचा वीजपुरवठा पूर्ववत झाला.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुळशी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुळशी तालुक्यातील नेरे दत्तवाडी येथील तीन वीजखांब कोसळले. तेथील शेतात पाणी साचल्यामुळे वीजखांब असलेल्या परिसरात चिखल झाला होता. त्यामुळे खांब उभे करण्यात अडचणी येत होत्या. मात्र, त्यानंतरही महावितरणचे अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी तीन वीजखांबांची उभारणी केली.
रविवारी (२५ मे) १५ ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. तर तीन वीजग्राहकांच्या सर्व्हिस केबलमध्ये बिघाड झाल्याने त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत होण्यास वेळ लागला. सर्व्हिस केबलची दुरुस्ती करून रविवारी त्यांचाही वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती महावितरणने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.