पुणे : आगामी महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे शंभराहून अधिक नगरसेवक विजयी झाले, तरच भारतीय जनता पक्षाची सत्ता आली असे मी समजेन. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अठरा ते वीस तास काम करण्याची तयारी ठेवावी. शिंदे गटाच्या जागाही निवडून आणण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा, अशी सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी येथे केली. स्वच्छ, सुंदर, सधन, सुरक्षित पुणे अशी घोषणा करताना चंद्रकांत पाटील यांनी यापुढे कार्यक्रमावेळी फटाके वाजविले तर कार्यक्रमातून निघून जाईन, अशा इशारा दिला. तसेच कमी पण अधिकृत फ्लेक्स लावा, अशी सूचनाही कार्यकर्त्यांना केल्या.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंत्री चंद्रकांत पाटील यांचा गुरुवारी सत्कार करण्यात आला. त्या वेळी महापालिकेत पुन्हा एकहाती सत्ता मिळविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, माजी महापौर, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, माजी सभागृहनेता गणेश बीडकर, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या खऱ्या शिवसेनेचा भगवा फडकेल; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे वक्तव्य

गेल्या अडीच वर्षांत भाजपपुढे मोठी आव्हाने होती. भाजप कार्यकर्त्यांवर खुन्नस काढण्यात आली. खटले दाखल करण्यात आले. राज्यातील भाजप सरकारच्या योजना, प्रकल्प महाविकास आघाडी सरकारने रद्द केले. कार्यकर्त्यांना त्रास दिला. महिलांवर अत्याचार केले. मात्र त्यानंतरही भाजपचा कार्यकर्ता पक्षाशी एकनिष्ठ राहिला, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. आता कमी काळात खूप मोठे काम करायचे आहे. आगामी निवडणुका विकासाच्या आधारे लढवायच्या आहेत. केंद्रात सरकार आहे. अठरा राज्य भाजपच्या हातात आहेत. सर्व काही हाताशी आहे. आता शहर विकासाचे प्रश्न गतीने सोडवायचे आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, जायका प्रकल्प, मेट्रो, वर्तुळाकार मार्ग पूर्ण करायचे आहेत. त्यासाठी अठरा ते वीस तास काम करावे लागणार आहे. जबबादारी आणि निधी द्यावा, असे कार्यकर्त्यांना वाटते. मात्र कार्यकर्त्यांनी कामाचे नियोजन केले पाहिजे. आगामी काळात १३० महामंडळांच्या घोषणा करायची आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी नावे द्यावीत. निष्ठेने काम करणाऱ्यांची माहिती संकलित करावी, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : पितांबरीचे रवींद्र प्रभुदेसाई यांना ‘दाजीकाका गाडगीळ उदयोगरत्न’ पुरस्कार

टीकेकडे खेळ म्हणून पाहतो

‘बाहेरचा’ अशी टीका माझ्यावर सातत्याने केली जाते. त्याकडे मी खेळ म्हणून पाहतो. कोथरूडमधून निवडणूक लढविण्याची सूचना मला वरिष्ठ नेत्यांनी केली. कोल्हापूरमधील चार विधानसभा मतदारसंघ माझ्यासाठी सुरक्षित होते. तेथून मी विजयी झालो असतो. मात्र पक्षाने मला मिशन दिले आहे. माढा, हातकणंगले, पुणे, बारामती हे मिशन साध्य करायचे आहे, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावरी टीकेला उत्तर दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फटाके फोडले तर… पाटील यांचा इशारा

चंद्रकांत पाटील यांच्या सत्काराचे फलक शहराच्या विविध भागात जागोजागी लावण्यात आले होते. त्यावरून आम आदमी पक्षाने तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली होती. त्याची दखल घेत कार्यकर्त्यांनी अनधिकृत फलक लावू नयेत. फलक लावयाचे झाले तरी परवानगी घ्यावी आणि ते कमी प्रमाणात लावावेत, अशी सूचना त्यांनी केली. तसेच कार्यक्रमावेळी फटाके वाजविले तर कार्यक्रमातून निघून जाईन, असा इशाराही त्यांनी दिला.