पुणे : शहरातील विविध रस्त्यांवर होणाऱ्या बेकायदा अतिक्रमणांमुळे अनेक भागात वाहतूक कोंडी निर्माण होते. पदपथांवर अनधिकृतपणे पथारी व्यावसायिक बसतात. दुकानदारांनी तसेच हॉटेल चालकांनी दुकानाच्या समोरील आणि आजूबाजूच्या मोकळ्या जागेत (फ्रंट व साइड मार्जिनमध्ये) बांधकाम केल्याचे समोर आले आहे.

या बेकायदा पद्धतीने करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर तसेच बांधकामांवर कडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत. या आदेशाची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय अधिक्रमण तसेच बांधकाम विभागाने घेतला आहे. महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयासह मुख्य विभागाच्या वतीने अतिक्रमणांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत असलेले फुटपाथ, रस्त्यावर, तसेच दुकानासमोरील आणि आजूबाजूच्या जागेत झालेल्या बांधकामावर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये तब्बल १३ हजार ४७५ चौरस फूट कच्चे-पक्के बांधकाम पाडण्यात आले. डीपी रस्ता, आंबेडकर चौक ते वारजे हायवे पूल, समर्थ पथ, गुलाबराव ताठे पथ येथे ही कारवाई झाली.

बांधकाम विकास विभाग, अतिक्रमण निर्मूलन विभाग यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. कारवाई दरम्यान महाराष्ट्र सुरक्षा दलाचे पाच जवान, तीन पोलिस कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे अधिकारी-कर्मचारी, आठ साहाय्यक निरीक्षक, बिगारी सेवक तसेच चार ट्रक आणि एक पिंजरा वाहन अशी यंत्रणा तैनात करण्यात आली होती. या मोहिमेत पाच हातगाड्या, आठ काउंटर, नऊ फ्रिज, १० पथारी, २७ शेड आणि इतर २१ साहित्य जप्त केले.

क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत झालेल्या अतिक्रमणांनी परिसराला विविध समस्यांनी ग्रासले होते. त्याचा नाहक त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागत होता. या अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याची दखल घेत महापालिकेचा अतिक्रमण आणि बांधकाम विभागाने ही कारवाई केल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

कनिष्ठ अभियंता सागर शिंदे, अतिक्रमण निरीक्षक संजय जाधव, अविनाश धरपाळे, वैभव जाधव, प्रदीप महाले, ज्ञानेश्वर बावधने, दिनेश नवाळे, किरण पाटील, आविष्कार दवणे, आकांक्षा खोडे व प्रथमेश पाटील यांनी ही कारवाई केली. अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त संदीप खलाटे, परिमंडळ ३ चे अपर आयुक्त अमित काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली, तर वारजे-कर्वेनगर विभागाचे साहायक आयुक्त सोमनाथ आढाव यांच्या नियंत्रणाखाली पार पडली.

बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत झालेल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. यावेळी १७ हजार ३०० चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले. पत्रा शेड, गाळे, टपऱ्या यासह हॉटेल आणि दुकानांमध्ये फ्रंट आणि साईड मार्जिन यावर कारवाई करण्यात आली. एक जेसीबी, गॅस कटर, ६७ अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यात सहभागी झाले होते.