पुणे : दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये शहरात अतिरिक्त तयार झालेल्या ७५० टन कचऱ्याची विल्हेवाट महापालिकेने लावली. नरक चतुर्दशी ते भाऊबीज (२० ते २४ ऑक्टोबर) या काळात प्रत्येक दिवशी सर्वसाधारण १५० टन अतिरिक्त कचरा तयार झाला. यामध्ये फटाके, भेटवस्तूंचे कागद यासह दिवाळीच्यानिमित्त बाहेर काढण्यात आलेल्या जुन्या वस्तूंचा कचरा याचा समावेश होता.
शहरात दररोज सर्वसाधारण २५०० ते २६०० टन कचरा तयार होतो. दिवाळीच्या काळात यामध्ये वाढ होऊन हे प्रमाण २९०० टनांच्या घरात गेल्याचे महापालिकेच्या घनकचरा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. दिवाळीमध्ये तयार होणाऱ्या कचऱ्यामध्ये सुका कचरा अधिक होता.
यामध्ये भेटवस्तूंचे कागद, फटाक्यापासून तयार होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण अधिक होते. दिवाळीच्या काळात शहरातील कचरा रोजच्या रोज उचलला जावा, यासाठी आवश्यक ते नियोजन घनकचरा विभागाकडून करण्यात आले होते.
‘घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांना तसेच दररोज कचरा गोळा करणाऱ्या सेवकांनाही दिवाळीचा सण साजरा करता यावा, यासाठी आवश्यक ती व्यवस्था करावी,’ अशा सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोग्य निरिक्षकांना दिल्या होत्या. ‘शहरातील कोणत्याही भागांतील कचरा सणाच्या काळात रस्त्यावर तसाच पडून राहू नये, यासाठी आवश्यक ती काळजी घेण्यात आली. त्यामुळे दिवाळीच्या सणामध्ये अडचणी आल्या नाहीत,’ असे घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितले.
दिवाळीला सुरुवात होण्यापूर्वी नागरिक जुन्या गाद्या, फर्निचर तसेच न लागणाऱ्या वस्तू कचऱ्यात टाकून देतात. घराची स्वच्छता करताना या वस्तू सर्रासपणे नदीपात्राजवळ तसेच रात्रीच्या वेळी रस्त्यावर टाकून दिल्या जातात. अनेकदा हा कचरा उचलला जात नाही.
या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी महापालिकेच्या घनकचरा विभागाने विशेष मोहिम राबविली होती. फर्निचर, गाद्या, गोधड्या, उशा हा कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेने मोहीम राबवून नागरिकांकडून या वस्तू गोळा केल्या. असे कदम यांनी सांगितले.
शहरात लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला होता. हा कचरा सकाळी लवकर उचलला जाण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. यासाठी प्रत्येकावर जबाबदारी निश्चित केली होती. सणाच्या काळात शहरातील कोणत्याही भागांत आणि रस्त्यावर कचरा दिसू नये, अशा सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या होत्या. महापालिका आयुक्त शहरातील विविध भागात भेट देऊन पाहणी करत होते. त्यामुळे यंदाच्या वर्षी विशेष काळजी घेण्यात आल्याचे उपायुक्त कदम यांनी सांगितले.
| दिवस | जमा झालेला कचरा |
| २० ऑक्टोबर | २७८१ |
| २१ ऑक्टोबर | २१२७ |
| २२ ऑक्टोबर | २३९६ |
| २३ ऑक्टोबर | २८३९ |
| २४ ऑक्टोबर | २९०८ |
