निवडणुका जवळ आल्या, की गेल्या काही वर्षांत राजकीय पक्ष आणि इच्छुकांच्या काही हालचाली सुरू होतात. महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागताच पुण्यात ‘श्रावणबाळां’ना मतदाररूपी माता-पित्यांची प्रकर्षाने आठवण होऊ लागली आहे. त्यामुळे आता काशी यात्रा नसल्या, तरी प्रभागा-प्रभागांमधील मतदारांना कोणत्या ना कोणत्या ठिकाणी यात्रा पर्यटन घडवून आणले जाऊ लागले आहे. यात्रांबरोबरच या इच्छुक ‘श्रावणबाळां’कडून आतापासूनच जेवणावळींचा बेत आखण्यात येत असल्याने मतदारांना आपण ‘राजा’ असल्याची जाणीव होऊ लागली आहे.
मतदारांना आपलेसे करण्यासाठी तीर्थक्षेत्र किंवा पर्यटन क्षेत्राची भेट घडवून आणायची युक्ती गेल्या काही वर्षांपासून राजकीय मंडळींनी अवलंबणे सुरू केले आहे. कोणतीही निवडणूक आली, की या यात्रांचे पेव फुटते. आई-वडिलांना तीर्थक्षेत्राला घेऊन निघालेलो आपण ‘आधुनिक श्रावणबाळ’ असल्याच्या थाटात इच्छुक आपापल्या प्रभागांमधील नागरिकांना यात्रेला घेऊन जातात. आता पुणे महापालिकेची निवडणूक जवळ येताच वर्षासहलींपासून तीर्थयात्रांचे आयोजन करण्यात येऊ लागले आहे. उमेदवारीची खात्री असलेल्या इच्छुकांकडून हा संपर्काचा आणि मतदारांना आमिष दाखविण्याचा मार्ग सध्या मोठ्या प्रमाणात अवलंबण्यात येत असल्याने मतदारांना वेगवेगळ्या ठिकाणांचे दर्शन घडू लागले आहे.
निवडणुकीची धामधूम सुरू झाली, की जेवणावळी या आल्याच! कार्यकर्त्यांपासून ते मतदारांपर्यंत सर्वजण या जेवणावळीचा आस्वाद घेत हात धुऊन घेत असतात. सध्या प्रत्यक्ष निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वीच आता जेवणावळीचा बेत आखला जाऊ लागला आहे. मात्र, या जेवणावळीचे स्वरूप आता बदलू लागले आहे. त्यासाठी भाजपची ‘टिफिन बैठक’, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ‘राष्ट्रवादी परिवार मीलन’ सुरू झाले आहे. या निमित्ताने या दोन्ही पक्षांनी जेवणावळीचा नवीन फंडा सुरू केला असताना, शिवसेना (शिंदे) पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या पक्षांनीही अशा बैठकांवर जोर दिला आहे. काँग्रेस मात्र सध्या यात्रा आणि जेवणावळीपासून दूर असल्याचे चित्र दिसून येते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाचे अद्याप तळ्यात-मळ्यात असल्याने त्यांच्याकडूनही फारशा हालचाली नसल्याचे दिसून येते. उमेदवारीची खात्री असलेले आणि उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असलेले इच्छुक मात्र जेवणावळीसाठी मतदारांना आग्रह धरू लागले आहेत.
काँग्रेसच्या काळात जाहीरपणे उठणाऱ्या पंगतीची चर्चा होत असे. मात्र, निवडणूक आयोगाच्या करड्या नजरेमुळे या पंगती आता उघडपणे होत नाहीत. भाजपने २०१९ नंतरच्या निवडणुकांपासून त्यासाठी नामी मार्ग काढला. पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते यांच्याशी संवाद वाढावा, यासाठी ‘टिफिन बैठक’ ही संकल्पना सुरू केली. या संकल्पनेनुसार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे शहर आणि ग्रामीण भागात वस्त्या आणि गावागावांमध्ये जाऊन एकत्र भोजनाचा आस्वाद घेत असतात. जेवणावळी सुरू असताना सरकारच्या कामगिरीचा आढावा, विकास योजनांची माहिती, स्थानिक प्रश्नांवर चर्चा करत मतदारांचा कल काय आहे, याचा अंदाजही काढतात. या टिफिन बैठकांना प्रतिसाद मिळण्याबरोबर निवडणुकीतही यश मिळत असल्याचे लक्षात आल्यावर या बैठका वाढल्या. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपने या ‘टिफिन बैठका’ सुरू केल्या आहेत. त्यानुसार पदाधिकारी, कार्यकर्ते हे घरून डबे आणून एकत्र स्नेहभोजन करत पक्षाची ध्येयधोरणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करत आहेत. भाजपने प्रत्येक बूथनिहाय ‘टिफिन बैठका’ घेण्याचे नियोजन सुरू केले असल्याने जेवणावळीचा आस्वाद या काळात मतदारांना घेता येणार आहे.
भाजपच्या संगतीत आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षानेही भाजपच्या या संकल्पनेचे अनुकरण करत ‘राष्ट्रवादी परिवार मीलन’ सुरू केले आहे. त्याचा प्रारंभ हडपसरमधून करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात पक्षाचे कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत न्याहारी, जेवणाचा आस्वाद घेतला. त्याचबरोबर हडपसर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन संवाद साधला. पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन नाश्ता, जेवण करण्याबरोबर रात्री कार्यकर्त्यांसोबत स्नेहभोजनही केले. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी अजित पवार यांनी ‘राष्ट्रवादी परिवार मीलन’ हा उपक्रम सुरू केल्यानंतर या पक्षातील इच्छुकांकडून आता मतदारांबरोबर मीलन घडवून आणण्यासाठी जेवणावळीचा सपाटा सुरू आहे. त्यामध्ये प्रभागातील मतदारांबरोबरच काही वरिष्ठ स्थानिक नेत्यांनाही आमंत्रित केले जाऊ लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
तीर्थयात्रा आणि जेवणावळीच्या माध्यमातून आधुनिक श्रावणबाळ हे निवडणुकीपूर्वी पुण्य कमाविण्याचा प्रयत्न करत आहेत. या तीर्थयात्रांतून किती जणांना नगरसेवकपदाचे दर्शन घडणार आणि जेवणावळीतून मतदार तृप्त होणार, की फक्त हात धुऊन घेणार, हे इच्छुकांना लवकरच उमजेल.
sujit.tambade@expressindia.com