पुणे : गुलटेकडी, मार्केट यार्ड येथील गंगाधाम चौकात सतत अपघात होत असतानाही महापालिका तेथे आवश्यक त्या उपाययोजना करण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या युवक आघाडीच्या वतीने बुधवारी महापालिकेत आंदोलन करण्यात आले. महापालिकेच्या निष्क्रियतेच्या निषेधार्थ जखमी व्यक्तींची वेषभूषा करून महापालिकेतील अधिकाऱ्यांना खेळण्यातील जड वाहने भेट देऊन आंदोलन करण्यात आले.
‘गंगाधाम चौकात सतत जीवघेणे अपघात होत आहेत. एका ज्येष्ठ महिलेचा अपघाती मृत्यू होऊन गुरुवारी एक वर्ष पूर्ण होईल. पालिकेने त्यावेळी जाहीर केलेल्या उपाययोजना अद्यापही येथे करण्यात आलेल्या नाहीत. बांधकाम व्यावसायिक, गोदाम व्यावसायिकाांच्या हितासाठी तीव्र उतार कमी करण्याची निविदा रखडविण्यात आली आहे. जड वाहनांवर असलेली बंदी कागदावरच आहे,’ असा आरोप यावेळी करण्यात आला.
युवक आघाडीचे शहराध्यक्ष किशोर कांबळे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात अजिंक्य पालकर, रोहन पायगुडे, अमोल परदेशी, प्राजक्ता जाधव, लखन वाघमारे, विद्या ताकवले, समीर पवार, अमोल ननावरे, नीलेश पवार हे सहभागी झाले होते. पथविभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावस्कर यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.
‘गंगाधाम रस्त्यावर जड वाहनांना बंदी करावी’
‘गंगाधाम चौकात सतत वाहनांची वर्दळ असते. कात्रज-कोंढवा रस्त्यावरून या चौकात येणाऱ्या जड वाहनांची संख्या मोठी आहे. आई माता मंदिराकडून गंगाधाम चौकात येताना रस्त्याचा उतार खूप तीव्र आहे. हा उतार कमी करण्यासाठीच्या कामासाठी महापालिकेने निविदा मागविली आहे. त्याला मान्यता मिळाल्यानंतर हे काम तातडीने केले जाणार आहे. यापूर्वी देखील या रस्त्यावर अनेक अपघात झाले असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा रस्ता जड वाहनांसाठी बंद करावा,’ असे पत्र महापालिकेने वाहतूक पोलिसांना पाठविले आहे.
यापूर्वी देखील महापालिकेने या रस्त्यावर जड वाहनांना बंदी घालण्याची विनंती वाहतूक पोलिसांना केली असल्याचे पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले. तसेच, जड वाहने या रस्त्यावर येऊ नये, यासाठी आई माता मंदिर येथे अवजड वाहनांसाठी अडथळा ठरणारे लोखंडी खांब (हाईट बॅरिअर) उभारण्यात यावेत, अशी मागणीही वाहतूक पोलिसांकडे केल्याचे पावसकर यांनी सांगितले.