पुणे : आगामी गणेशोत्सवासाठी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठीची नियमावली महापालिकेकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी सन २०१९ मध्ये देण्यात आलेले उत्सव मंडप, स्वागत कमानी आणि रनिंग मंडपाच्या परवानग्या ग्राह्य धरण्यात येणार आहेत. अशा परवानाधारकांना नव्याने परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. मात्र, उत्सव मंडपाची उंची ४० फुटांपर्यंत ठेवण्याची मर्यादा घालण्यात आली आहे. त्यापेक्षा जास्त उंचीचा मंडप उभारण्यासाठी मंडळांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्थापत्य लेखापरीक्षण प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यंदाचा गणेशोत्सव १९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. त्या अनुषंगाने सार्वजनिक गणेश मंडळांची उत्सवाची तयारी सुरू झाली असून, उत्सवासाठीच्या अटी आणि शर्ती महापालिकेकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याबाबतची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

ज्या मंडळांना नव्याने गणेशोत्सव साजरा करायचा आहे किंवा पूर्वीच्या म्हणजे सन २०१९ मधील परवानगीची जागा प्रकल्पबाधित झाली असेल किंवा अन्य कारणास्तव जागेत बदल करणे आवश्यक आहे, अशा मंडळांना नवीन जागेवरील सर्व परवानग्या सन २०१९ च्या प्रचलित कार्यपद्धतीचा अवलंब करून संबंधित क्षेत्रीय कार्यालय आणि पोलीस स्थानकाकडून आवश्यक परवाने घेणे बंधनकारक राहणार आहे. या परवानग्यांसाठी महापालिकेकडून कोणत्याही परवाना शुल्काची आकारणी करण्यात येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : जिल्हा परिषदेत नोकरीसाठी चुरस…पदे एक हजार; अर्ज आले ७४ हजार!

सन २०१९ मधील किंवा नव्याने घेतलेल्या सर्व परवान्यांच्या प्रती मंडप आणि कमानीच्या दर्शनी भागात ठळकपणे लावणे बंधनकारक आहे. उत्सव मंडपाची उंची ४० फुटांपेक्षा जास्त नसावी. त्यापेक्षा जास्त उंचीचा मंडप उभारण्यासाठी स्थापत्य लेखापरीक्षण प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले आहे. मंडप आणि स्वागत कमानी उभारताना आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशामक दल, रुग्णवाहिका, तसेच पीएमपीसाठी रस्ते मोकळे ठेवावे लागणार असून, कमानीची उंची रस्त्याच्या पृष्ठभागापासून १८ फुटांपेक्षा जास्त ठेवावी लागणार आहे. उत्सवानंतर मंडळांनी पुढील तीन दिवसांच्या आत स्वखर्चाने मंडप, कमानी, रनिंग मंडप, रस्त्यावरील देखावे, विटांची बांधकामे हटवून रस्त्यावरील खड्डे स्वखर्चाने हटवावे लागणार आहेत. तसेच ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची दक्षता मंडळांना घ्यावी लागणार आहे, असेही विक्रम कुमार यांनी सांगितले.

हेही वाचा : ‘एफडीए’चे दूध भेसळ रोखण्याच्या कामाकडे दुर्लक्ष, अपर जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी

ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारीसाठी नि:शुल्क दूरध्वनी

रहिवासी, पादचाऱ्यांना अडथळा होणार नाही, तसेच ध्वनिप्रदूषणाचा त्रास होणार नाही, याची दक्षता मंडळांना घ्यावी लागणार आहे. तसेच उत्सव कालावधीत या संदर्भात नागरिकांना १८०० १०३ ०२२२ या नि:शुल्क क्रमांकावर दूरध्वनीद्वारे तक्रार नोंदविता येणार आहे. तसेच पुणे कनेक्ट, ९६८९९००००२ या व्हाॅटस ॲप क्रमांकावर, तसेच http://complaint.punecorporation.org या संकेतस्थळावर तक्रार करता येणार आहे. या तक्रारींचे निवारण क्षेत्रीय कार्यालय आणि स्थानिक पोलीस ठाण्यांच्या स्तरावर करण्यात येणार आहे.

हेही वाचा : तलाठी होण्याचे स्वप्न भंगले… एक मिनिटाचा उशीर झाल्याने उमेदवार परीक्षेला मुकले

स्टाॅलसाठी परवानगी आवश्यक

गणेशमूर्ती विक्री स्टाॅलसाठी गेल्या वर्षीप्रमाणेच सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील महापालिका शाळांचे पटांगण, महापालिकेच्या मोकळ्या जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महापालिकेच्या मालमत्ता आणि व्यवस्थापन विभागाकडून त्या संदर्भात परवानगी देण्यात येणार आहे. तसेच अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून नेहमीप्रमाणे हंगामी व्यवसायासाठी काही अटी-शर्तींवर जागा, गाळे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.