पुणे : सिंहगड रस्त्यावरील ज्या भागात ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ (जीबीएस) चे रुग्ण वाढत आहेत. अशा किरकटवाडी, धायरीमधील सोसायट्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या टँकरने पाणी देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, नक्की किती टँकरने पाण्याचे देणार, हे महापालिकेने अद्याप स्पष्ट केलेले नाही.

गेल्या काही दिवसांपासून नांदेड, नांदोशी यासह धायरी, किरकटवाडी तसेच अन्य भागांत ‘जीबीएस’च्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या भागांत महापालिकेचे शुद्ध पाणी पुरविले जात नाही. शुद्धीकरण न करता एका विहिरीच्या माध्यमातून हे पाणी घरोघरी जात असल्याने नागरिकांना जुलाब, उलट्या, हातपाय दुखणे असे त्रास सुरू झाले आहेत. विहिरीतून दिले जाणारे खराब असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून केली जात होती.

परिसरातील जीबीएस रुग्णांची वाढत असलेली संख्या लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून आता महापालिकेने धायरी, किरकटवाडी येथील ११ सोसायट्यांना पिण्याचे पाणी टँकरने देण्याची व्यवस्था केली आहे. महापालिकेच्या वतीने या सोसायटीतील नागरिकांना टँकरद्वारे पिण्याचे पाणी दिले जाणार आहे. सध्या किरकीटवाडी, खडकवासला, नांदेड यासह आजूबाजूच्या गावांना एका विहिरीतून पाणी पुरवठा केला जातो. ही गावे महापालिका हद्दीत येण्यापूर्वी ज्या पद्धतीने पाणी देण्याची व्यवस्था होती, त्याचीच अंमलबजावणी महापालिकेच्या वतीने केली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिकेच्या वतीने ज्या सोसायट्यांना टॅंकरने पाणी दिले जाते त्यामध्ये डीएसके विश्व, उत्सव, मोरया स्पर्श, पांडुरंग रेसिडेन्सी, कल्पक होम फेज २, अर्बन पार्क, कलम ग्रीन लीफ, आनंदबन, इंगवले पाटील कॉम्प्लेक्स, उज्वल निसर्ग सोसायटी, साई गॅलॅक्सी या सोसायट्यांचा समावेश आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.