पुणे : लहान मुलांमध्ये खेळांची आवड निर्माण करण्यासाठी पुणे महापालिकेने ‘क्रीडा नर्सरी’ प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हडपसर येथील क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या तीन एकर जागेवर हा प्रकल्प उभारला जाणार असून, असा प्रकल्प राबविणारी पुणे महापालिका देशातील पहिली महापालिका ठरणार आहे.

बालवयातच मुलांमध्ये वेगवेगळ्या खेळांची आवड निर्माण करणे, त्यांचे मैदानाबरोबर नाते जोडणे, तसेच मनोरंजनामधून खेळांची माहिती करून देणे मुख्य उद्देश या नर्सरीचा आहे. महापालिकेने २०१३ मध्ये क्रिडा धाेरण तयार केले हाेते. या धोरणामध्ये क्रीडा नर्सरीचा समावेश करण्यात आला होता. तीन ते सात वर्षाच्या मुलांचा एक गट आणि आठ ते १२ वर्षे वयोगट अशा दोन गटांमध्ये विभागणी करून सकाळी आणि सायंकाळच्या सत्रात ही नर्सरी सुरू करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे, अशी माहिती क्रीडा विभागाच्या प्रमुख किशाेरी शिंदे यांनी दिली.

हडपसर, मगरपट्टा येथील सर्व्हे नंबर १३५/६ आणि १३७/४ ही जागा क्रीडांगणासाठी आरक्षित आहे. ही संबंधित जागा मालकांकडून महापालिकेच्या ताब्यात देण्यात आली आहे. ही जागा भूसंपादन विभागाकडून नुकतीच क्रीडा विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. ही जागा सुमारे तीन एकर इतकी असून, या ठिकाणी विविध खेळांची मैदाने तयार केली जाणार आहेत.

सध्या याचा आराखडा तयार करण्याचे काम केले असून, हा प्रकल्प उभारण्याासाठी सुमारे तीन काेटी रुपयांची आवश्यकता आहे. क्रीडा विभागाकडे असलेल्या तरतुदीमधून यासाठी एक काेटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत ही क्रीडा नर्सरी सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचेही क्रिडा विभागाच्या प्रमुख शिंदे यांनी सांगितले.

लहान मुलांना मैदानी खेळांचा विसर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्याच्या काळात लहान मुलांकडून मोबाइलचा वापर अधिक वाढत चालला आहे. लहान मुलांना मैदानी खेळांचा विसर पडत चालला आहे. मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहावे, त्यांच्या विकासाला चालना मिळावी, यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणार आहे. लहान मुले एकलकोंडी होत असून, त्यांचा चिडचिडपणा, राग, हट्टीपणा वाढतच चालला आहे. तो कमी करण्यासाठी याचा फायदा होणार आहे.