पुणे : शहरातील विविध भागांमध्ये महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या वातानुकूलित स्वच्छतागृहांत वातानुकूलन यंत्रणा न बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. वातानुकूलन यंत्रणेचा खर्च अतिरिक्त ठरत असल्याने ही सुविधा वगळण्यात आली आहे.
कामानिमित्त शहरात येणाऱ्या बाहेरगावच्या नागरिकांसाठी शहराच्या प्रवेशद्वारावर अद्ययावत आणि वातानुकूलित स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शहराच्या पाच भागांमध्ये ही स्वच्छतागृहे उभारली जाणार असून, बाणेर येथे पहिल्या वातानुकूलित स्वच्छतागृहाचे काम महापालिकेने सुरू केले आहे. पुढील सहा महिन्यांत हे काम पूर्ण होणार आहे. या अद्ययावत स्वच्छतागृहांमध्ये वायफाय, मोबाइल व लॅपटॉप चार्जिंग सुविधा, अंघोळीची सोय, कपडे बदलण्याची खोली, तसेच अपंग, वृद्ध व्यक्तींसाठी रॅम्प अशा सुविधा उपलब्ध असणार आहेत. ठरावीक शुल्क भरून नागरिकांना याचा वापर करता येणार आहे.
शहरातील उर्वरित तीन भागांत ही अद्ययावत स्वच्छतागृहे उभारण्यासाठी मान्यता द्यावी, असा प्रस्ताव घनकचरा विभागाकडून गेल्या आठवड्यात स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. एका स्वच्छतागृहासाठी ८७ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. पाच स्वच्छतागृहे उभारण्यासाठी महापालिकेला साडेचार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. महापालिकेने वातानुकूलित स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेतल्याने सजग नागरिक मंचासह शहरातील इतर काही स्वयंसेवी संस्थांनी यावर आक्षेप घेतला होता.
शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवा, त्यामध्ये पुरेसे पाणी उपलब्ध करून द्या, वातानुकूलन यंत्रणा नागरिकांना नकाे, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली होती. यावर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत चर्चा केली. त्यामध्ये स्वच्छतागृहांमध्ये एसी बसविल्यामुळे अतिरिक्त खर्च येऊ शकताे, त्याची देखभाल-दुरुस्ती, वीज बिल या गाेष्टी व्यवहार्य ठरत नसल्याने या स्वच्छतागृहामध्ये एसी बसविण्यात येऊ नये, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.
महापालिका उभारत असलेल्या अद्ययावत स्वच्छतागृहांची स्वच्छता व देखभाल करण्याबाबत तीन पर्यायांचा विचार सुरू आहे. खासगी संस्थांकडून उभारणी झाल्यास, हा खर्च भागवण्यासाठी जाहिरात हक्क देण्याची तरतूद आहे. केअर टेकरमार्फत ही स्वच्छतागृहे चालविण्यास देणे, महापालिका स्वत: ही स्वच्छतागृहे संचलन करणार अशा पर्यायांवरदेखील प्रशासनाने विचार सुरू केला आहे. या ठिकाणी मिळणाऱ्या प्रतिसादानुसार पर्यायाचा विचार करावा लागेल, असेही पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.