पुणे : आगामी महापालिकेच्या निवडणुकीची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली आहे. यासाठी २३ विशेष कक्षांची स्थापना करण्यात आली असून या कक्षांसाठी संबंधित अधिकारी नेमण्यात आले आहेत. नियुक्ती केलेल्या अधिकाऱ्यांनी तत्काळ कामाला सुरुवात करावी, असे आदेश आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या प्रभाग रचनांबाबत आलेल्या हरकती आणि सूचनांवर सुनावणी पूर्ण झाली आहे. सुनावणी घेऊन याबाबतचा अहवाल सनदी अधिकारी व्ही. राधा यांनी नगरविकास विभागाकडे सादर केला आहे. पुढील महिन्यात प्रभाग रचनेची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर होणार आहे.
महापालिकेची आगामी निवडणूक जानेवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. प्रभाग रचना ६ ऑक्टोबर पूर्वी अंतिम होऊन त्यानंतर प्रभागांचे आरक्षण निश्चित होणार आहेत. निवडणुकीसाठी सर्वच पक्षात इच्छुकांची तयारी सुरू झाली आहे. निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना आता महापालिका प्रशासनाने देखील तयारी सुरू केली आहे.
निवडणुकीच्या कामासाठी २४ हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार आहे. त्यापैकी सुमारे १९ हजार कर्मचारी उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच २३ कक्ष स्थापन केले आहेत. प्रत्येक कक्ष प्रमुखांना त्यांच्या कामकाजाचा अहवाल थेट महापालिका आयुक्तांना सादर करावा लागणार आहे.
निवडणुकीसाठी महापालिकेच्या पातळीवर हे कक्ष सुरू करण्यात आले असून त्यासाठी प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही कक्ष प्रमुखांनी निवडणूक आयोग अथवा राज्य सरकारशी थेट संपर्क साधू नये. काही अडचणी अथवा प्रश्न असतील तर निवडणूक विभागाचे उपायुक्त यांच्याशी संपर्क साधावा अशा सूचना या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. निवडणूक कार्यक्रम पूर्ण होऊन निकाल लागेपर्यंत ही जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर राहणार आहे.
असे आहेत कक्ष
निवडणूक कर्मचारी व व्यवस्थापन, टपाली मतपत्रिका व्यवस्थापन, थकबाकी ना हरकत प्रमाणपत्र, मतदान केंद्र व सोयीसुविधा, मतदान व मतमोजणी, स्टेशनरी व साहित्य वितरण, माहिती व जनसंपर्क, दूरसंचार सुविधा, बैठकांचे आयोजन, आचारसंहिता पालन, विद्रूपीकरण कारवाई, पेड न्यूज तपासणी, वाहतूक व्यवस्थापन, सभा-मंडप परवानगी, विद्युत व्यवस्थापन, माहिती व तंत्रज्ञान, ईव्हीएम व्यवस्थापन, समन्वय, निवडणूक खर्च तपासणी, विधी, आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा व्यवस्थापन असे कक्ष सुरू करण्यात आले आहेत.