पुणे : शैक्षणिक वर्षे निम्मे संपले असताना महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी चक्क साडेचार कोटी रुपयांची पुस्तके विनानिविदा खरेदी करण्याचा घाट महापालिकेच्या शिक्षण विभागाने घातला आहे. एका विशिष्ट प्रकाशनाचे हित साधण्यासाठी ही खरेदी केली जाणार असल्याची चर्चा महापालिकेत सुरू झाली आहे. स्थायी समितीच्या बैठकीत गेल्या आठवड्यात हा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. मात्र, आयुक्त नवल किशोर राम यांनी त्याला मान्यता न देता हा प्रस्ताव पुढे ढकलला होता. आज (शुक्रवारी) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय पुन्हा मान्यतेसाठी येणार आहे.

महापालिकेच्या शाळेतील इयत्ता दुसरी ते पाचवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, गणित इंग्रजी, बुद्धिमत्ता, संगणक या विषयांच्या लेखन सरावासाठी व्यवसाय पुस्तके खरेदीचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. विद्यार्थ्यांचे अर्धे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर पुस्तक खरेदीचा निर्णय घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एका ठरावीक प्रकाशनाची पुस्तके घेता यावीत, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे ही पुस्तक खरेदी निविदा न काढता करण्यात यावी, असा हट्ट धरला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महापालिकेने निविदा न काढता पुस्तकांची खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याने केवळ एकाच प्रकाशनाची ही पुस्तके घ्यावी लागणार आहेत. ही पुस्तके खरेदी केल्यानंतर त्याचे वितरण करण्यासाठी महापालिकेला एक ते दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात पुस्तके हाती पडण्यास नवीन वर्ष उजाडणार आहे. त्यानंतर तीन महिन्यांतच महापालिकेचे शैक्षणिक वर्षे संपणार असल्याने या पुस्तकांचा नक्की किती उपयोग विद्यार्थ्यांना होईल, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. याबाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांना विचारले असता, ते म्हणाले हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. त्यावर महापालिका आयुक्त योग्य निर्णय घेतील.

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना व्यवसाय पुस्तके द्यायची झाल्यास त्याची खरेदी निविदा काढूनच केली पाहिजे. निविदा काढल्यानंतर त्यामध्ये स्पर्धा होते. एवढी मोठी खरेदी करताना त्यामध्ये अधिक सवलत मिळू शकते. निविदा न काढता पुस्तकांची खरेदी करणे चुकीचे आहे. ही खरेदी बेकायदा आहे. – विवेक वेलणकर, सजन नागरिक मंच