पुणे : शहरातील विविध भागांतील रस्त्यांवरील अतिक्रमणे तसेच बेकायदा बांधकामांवरील कारवाई महापालिकेने सुरू ठेवली आहे. महापालिकेचा अतिक्रमण आणि बांधकाम विभागाच्या वतीने काही भागात संयुक्त कारवाई केली जात आहे. गुरुवारी औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय तसेच धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. भर पावसातही ही कारवाई सुरूच होती.

औंध भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते खडकी रेल्वे स्टेशन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते भाऊ पाटील रस्ता हॅरिस ब्रीज या ठिकाणी बेकायदा व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये दुकानासमोरील जागेत (फ्रंट मार्जिन, साईड मार्जिन) तसेच अनधिकृतपणे उभारलेले कच्चे बांधकाम, हॉटेल, तात्पुरती शेड अशा जवळपास ९८ अनधिकृत शेड पाडण्यात आल्या.

अतिक्रमण उपायुक्त संदीप खलाटे व सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता कामिनी घोलप, क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक राहुल बोकन, सहायक अतिक्रमण निरीक्षक वैभव जगताप, राहुल डोके, हाशम पटेल, पंकज आवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. यामध्ये लोखंडी जाळ्या, फ्रीज, काउंटर, लोखंडी मांडणी, टेबल, फर्निचर, लोखंडी कॉट असे तीन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईत सुमारे ६७ हजार ३६५ चौरस फूट क्षेत्र रिकामे करण्यात आले.

कात्रज चौक परिसरातही बांधकाम आणि अतिक्रमण विभागाच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली. परिमंडळ उपायुक्त विजयकुमार थोरात, सहाय्यक आयुक्त सुरेखा भणगे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. कनिष्ठ अभियंता विक्रांत क्षीरसागर, अतिक्रमण निरीक्षक सागर विभूते, तसेच सहाय्यक अतिक्रमण निरीक्षकांच्या पथकाने ही कारवाई केली.

या कारवाईत अडीच हजार चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले. पाच ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या कारवाईमध्ये पदपथावरील ३१ हजार ७०० चौरस फूट अनधिकृत अतिक्रमण काढून टाकण्यात आले.

शहरातील अनेक रस्त्यांवर बेकायदेशीर पद्धतीने व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली आहेत. यामुळे फुटपाथ वरून चालताना नागरिकांना जागा उपलब्ध राहत नाही. रस्त्यावरच विक्रीच्या वस्तू ठेवल्या जात असल्याने अडचण निर्माण होते. फूटपाथ उपलब्ध नसल्याने पादचारी रस्त्यावरून चालतात त्यामुळे वाहनचालकांना कमी प्रमाणात रस्ता उपलब्ध होतो. शहरात वाढणारी अतिक्रमणे ही वाहतूक कोंडीला जबाबदार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या अतिक्रमणांवर कारवाई केली जात आहे, असे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त संदीप खलाटे यांनी सांगितले. या पुढील काळात देखील ही कारवाई सुरू राहणार असल्याचे खलाटे यांनी स्पष्ट केले.