पुणे : शहरात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या (पीओपी) मूर्ती तयार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. गणेशोत्सवासह विविध सण, उत्सवात यंदाच्या वर्षापासून आता ‘पीओपी’च्या मूर्ती तयार करता येणार नाहीत. उच्च न्यायालयाने याबाबत आदेश दिले असून, त्याचे काटेकोरपणे पालन करावे, असे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांनी काढले आहेत.

‘पीओपी’च्या मूर्तीचा वापर करण्यास राज्य सरकारने यापूर्वीच बंदी घातलेली आहे. मात्र, काही प्रमाणात उत्सवाच्या काळात मूर्तिकारांकडून मूर्ती तयार केल्या जात होत्या. यंदाच्या वर्षी त्याची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, त्याची सुधारित नियमावली महापालिकेने प्रसिद्ध केली आहे.

त्यामुळे यापुढील काळात शहरात ‘पीओपी’च्या मूर्ती बनविण्यास आणि त्या पाण्यात विसर्जित करण्यास बंदी असणार आहे. ‘पीओपी’च्या वापराबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या ३० जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीत विविध सण-उत्सावांदरम्यान सर्व महापालिका, सर्व जिल्हाधिकारी यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांतील कलम २ नुसार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनविणे अथवा विसर्जित करणे यावर पूर्णपणे बंदीच्या आदेश देण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन झाल्यास पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ अन्वये, संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.

या आहेत मार्गदर्शक सूचना

  • मूर्ती या नैसर्गिक, पर्यावरणपूरक घटकांपासून कराव्यात.
  • मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात तसेच मूर्ती स्वीकृती केंद्रामध्ये देणे बंधनकारक
  • मूर्तीचे रंग जैव विघटनशील आणि बिनविषारी, नैसर्गिक असावेत
  • मूर्तींचे दागिने बनविताना वाळलेल्या फुलांच्या घटकांचा वापर करावा.
  • रासायनिक रंग, ऑइल पेंट्स, वापरण्यास बंदी
  • पूजेसाठी फुले, वस्त्र, पूजा साहित्य पर्यावरणपूरक असावे
  • अन्नदानासाठी एक वेळ वापराचे प्लास्टिक प्लेट, प्लास्टिक साहित्य वापरू नये.