पुणे : भटक्या मांजरांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेेने गेल्या वर्षभरात २ हजार ६६४ मांजरांवर नसबंदीची शस्त्रक्रिया करुन त्यांचे लसीकरण केले. दरम्यान, मांजर पकडण्यासाठी संबधित संस्थेला कसरत करावी लागत असल्याने नसबंदी करण्यासाठी अडचणी येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
शहरात भटक्या श्वानांसह भटक्या मांजरांचा उपद्रव वाढत चालला आहे. भटकी मांजरे गाड्यांची सीट फाडतात, घाण करतात, अशा तक्रारी नागरिकांकडून महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे येत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने भटक्या श्वानांप्रमाणेच भटक्या मांजरांची नसबंदी व शस्त्रक्रिया करून त्यांची संख्या देखील नियंत्रणात ठेवण्याचे नियोजन केले आहे.
मांजरी पकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचे काम भारतीय जीवजंतू कल्याण मंडळाची (एडब्ल्यूबीआय) मान्यता असलेल्या खासगी संस्थेला देण्यात आले आहे. निविदा काढून हे काम देण्यात आले आहे. संबधित संस्थेने स्वतःच्या किंवा भाड्याच्या जागेत मांजरांसाठी पायाभूत सुविधा उभारणे, शहरातील भटक्या आणि मोकाट मांजरांना पकडून त्यांना स्वतःच्या वाहनातून घेऊन जात त्यांच्यावर नसबंदीची शस्त्रक्रिया करणे, त्यांना रेबीज प्रतिबंधक लस देणे आणि टॅग लावून पकडलेल्या ठिकाणी सोडणे, अशा अटी घालण्यात आल्या आहेत.
या संस्थेने १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या वर्षेभराच्या काळात शहरातील २ हजार ६६४ भटक्या मांजरांवर नसबंदीची शस्त्रक्रिया करून लसीकरण केली. अशी माहिती महापालिकेच्या प्रभारी मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे-भोसले यांनी दिली. मांजर पकडण्याचे काम आव्हानात्मक असल्याने त्यामध्ये अडचणी येतात. परिणामी शस्त्रक्रिया आणि लसीकरणाचे काम कमी असल्याचे फुंडे यांनी सांगितले.