पुणे : महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची परवानगी न घेता शहरात बेकायदा पद्धतीने उभारण्यात आलेले २४ जाहिरात फलकांवर कारवाई करत महापालिकेने ते पाडून टाकले आहेत. महापालिकेने केलेल्या पाहणीत ८८ जाहिरात फलक बेकायदा असल्याचे समोर आले होते. त्या सर्व बेकायदा फलकांवर कारवाई केली जाणार असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.
महापालिकेची मान्यता न घेता शहरातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर तसेच चौकांमध्ये बेकायदा जाहिरात फलक उभारण्यात आल्याचे समोर आले होते. महापालिकेने केलेल्या पाहणीत विविध भागांत ८८ जाहिरात फलक बेकायदा पद्धतीने उभारण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. या जाहिरात फलकांवर कारवाई करून ते काढून टाकण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. आतापर्यंत २४ जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज यांनी दिली.
महापालिकेच्या हद्दीत कोणत्याही रस्त्यावर किंवा चौकांमध्ये जाहिरात फलक, फ्लेक्स उभारण्यासाठी महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची मान्यता घ्यावी लागते. महापालिकेने निश्चित केलेले शुल्क भरून आणि काही नियमांची पूर्तता केल्यानंतर संबंधितांना जाहिरात फलक उभारण्यासाठी मान्यता दिली जाते. यामधून महापालिकेला उत्पन्न मिळते. मात्र, शहरातील अनेक महत्त्वाच्या चौकांमध्ये तसेच रस्त्यांवर महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता बिनधास्तपणे जाहिरात फलक उभारले जातात. यामुळे महापालिकेचे उत्पन्नही बुडते.
शहरात बेकायदा पद्धतीने उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आकाशचिन्ह विभागाला दिले होते. त्यानुसार आकाशचिन्ह व परवाना विभागाने महापालिका हद्दीत उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकांची पाहणी केली. त्यावेळी ८८ ठिकाणी विनापरवाना जाहिरात फलक उभारण्यात आल्याचे समोर आले. यामध्ये नगररोड वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयात ३५, हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयात ३७, वानवडी रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयामध्ये ११ तर येरवडा- कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयात ५ असे एकूण ८८ अनधिकृत जाहिरात फलक आढळून आलेआहेत. त्यावर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
महापालिकेने आजपर्यंत केलेल्या कारवाईमध्ये नगररोड वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील १५, येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालयामधील १, वानवडी रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय परिसरातील ३, तर हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय परिसरातील ५ असे २४ जाहिरात फलक पाडण्यात आले आहे. ही कारवाई यापुढील काळातही सुरूच राहणार असून, उर्वरित बेकायदा फलकदेखील काढून टाकले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.