पुणे : महापालिकेची बांधकाम परवानगी न घेता बेकायदा बांधकाम करणाऱ्या कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, मुंढवा भागातील १५१ पब, बार व रेस्टॉरंटला महापालिकेने नोटीस बजावली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. या पब, बार चालकांनी नोटीसाला उत्तर देत योग्य तो खुलासा न केल्यास त्यांच्यावर कारवाई करून बेकायदा बांधकाम पाडून टाकण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.

कल्याणीनगर, कोरेगांव पार्क, खराडी येथे मोठ्या प्रमाणात बार, पब, रेस्टॉरंट आहेत. मध्यरात्री उशीरापर्यंत हे पब, बार चालू ठेवले जातात. त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या बारचालकांनी इमारतींच्या टेरेसवर, समोरील, पाठीमागील मोकळ्या जागेत (साईड व फ्रंट मार्जिनमध्ये) अनधिकृतपणे बांधकाम करून तेथे पब, बार व रेस्टॉरंट सुरू केले आहेत. याबाबत महापालिकेने पोलिसांशी चर्चा देखील केली आहे.

महापालिकेची मान्यता न घेता केलेले बांधकाम महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून नोटीस देऊन पाडून टाकले जाते. कोंढवा भागात करण्यात आलेल्या बेकायदा इमारतींवर देखील बांधकाम विभागाने कारवाई करुन त्या इमारती पाडून टाकल्या आहेत. याच अनुषंगाने महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी कल्याणीनगर, खराडी, कोरेगाव पार्क व मुंढवा या भागात पाहणी केली. त्यावेळी अनेक बार, पब मालकांनी बेकायदा बांधकान केल्याचे समोर आले.

याबाबतत अधिक माहिती देताना अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज म्हणाले, अनधिकृत बांधकाम करणाऱ्या व अवैधपणे चालविल्या जाणाऱ्या खराडी, कल्याणीनगर परिसरातील १५१ पब, बार व रेस्टॉरंटला नोटीस बजावण्यात आल्या आहेत. खुलाशानंतर संबंधित बांधकामांवर कारवाई करण्यात येणार आहे.

पोलिस, महापालिका व जिल्हा प्रशासनाची संयुक्त समिती

मुंढवा, कोरेगाव पार्क परिसरातील नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या पब, बार व रेस्टॉरंटवर नजर ठेवण्यासाठी आणि नियमांचे उल्लंघन केल्यानंतर कारवाई करण्यासाठी महापालिका, पोलिस आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली संयुक्त समिती तयार करण्यात आली आहे. या समितीची पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी घोषणा केली असून, दर १५ दिवसांनी कारवाईचा अहवाल देण्याचे आदेश या समितीला देण्यात आले आहेत.