पुणे : देशात सर्वांत प्रथम करोना प्रतिबंधक लस तयार करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटला पुणे महापालिका दररोज १५ लाख लिटर प्रक्रिया न केलेले पाणी देणार आहे. ‘सीरम’ने महापालिकेकडे पाणी देण्याची मागणी केली होती. त्यांना पाणी देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली असून, त्यासाठी ‘सीरम’कडून प्रति एक हजार लिटर पाण्यासाठी २७.४७ रुपये दर आकारणार आहे. त्या दरामध्ये प्रत्येक वर्षी १० टक्के वाढ केली जाणार आहे.

हडपसर, मांजरी भागात सीरम कंपनी आहे. सुमारे शंभर एकर क्षेत्रात ही कंपनी असून, वेगवेगळ्या प्रकारच्या लशी ‘सीरम’ तयार करते. करोना प्रतिबंधक लसदेखील या कंपनीने तयार केली होती. या कंपनीमध्ये सुमारे १० हजार कामगार काम करतात. ही कंपनी लस बनवत असल्याने कामगारांना कंपनीत येताना आणि कंपनीमधून बाहेर पडताना स्वच्छतेसाठी स्नानगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, त्यांचे उपाहारगृहदेखील कायम सुरू असते. यामुळे या कंपनीमध्ये पाण्याचा वापर अधिक आहे.

या कंपनीमधील कामगारांची १० हजार ही संख्या विचारात घेता प्रतिव्यक्ती ४५ लिटरप्रमाणे ४ लाख ५० हजार लिटर पाण्याची आवश्यकता असून, सीरम इन्स्टिट्यूटने महापालिकेकडे १५ लाख लिटर प्रतिदिन पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी हा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर ठेवला होता. ‘सीरम’ने प्रक्रिया न केलेले पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. सीरमला पाणी देताना महापालिका मीटर लावणार असून, त्याद्वारे हे पाणी दिले जाणार असल्याचे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.