पुणे : पाण्याचे मीटर बसविण्यात येऊ नयेत, यासाठी शहरातील काही सोसायट्या आणि नागरिकांनी विरोध सुरू केला असून, विरोध करणाऱ्यांचा थेट नळजोड बंद करण्याचा इशारा पुणे महापालिकेने दिला आहे. शहरातील पाण्याची गळती कमी होऊन नागरिकांना पुरेसे पाणी मिळावे, यासाठी महापालिकेच्या माध्यमातून समान पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून हे काम सुरू असून, यासाठी पाणीपुरवठ्याच्या ७२ विभागांचे काम पूर्ण झाले आहे. शहरात २ लाख ८० हजार पाण्याचे मीटर बसविले जाणार आहेत. या योजनेत जलवाहिन्यांचे जाळे निर्माण केले जात असून, या योजनेमध्ये ‘स्वयंचलित पाण्याचे मीटर’ (ऑटोमेटेड मीटर रीडिंग – एएमआर) मीटर बसविण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. मात्र, हे मीटर बसविण्यासाठी काही गृहनिर्माण सोसायट्या आणि नागरिकांकडून विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर, विरोध करणाऱ्यांना नळजोड बंद करण्याबाबतचे पत्र देण्यास पाणीपुरवठा विभागाकडून सुरुवात करण्यात आली आहे.
मीटर बसविण्यासाठी विरोध केला जात असल्याने महापालिकेला पाणी गळती शोधणे कठीण होत आहे. यामुळे शहरातील अनेक भागांत पाण्याची गळती होऊन पाणी वाया जात असल्याचे प्रकारही घडत आहेत. शहरात समान पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर कोणत्या भागात पाण्याचा किती वापर होतो, तेथील लोकसंख्या किती, प्रत्यक्ष पाण्याचा होणारा वापर याची सविस्तर माहिती मिळणार आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे शक्य होणार आहे. सध्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असतानाही नियोजन नसल्याने काही भागांत पाण्याची टंचाई भासत आहे. महापालिका मंजूर कोट्यापेक्षा अधिक पाणी घेत असल्याने जलसंपदा विभागाकडून महापालिकेवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
पाण्याची गळती शोधून पाण्याची बचत करण्याचे उद्दिष्ट पाणीपुरवठा विभागाने ठेवले आहे. त्यामुळे समान पाणीपुरवठा योजनेनुसार मीटर बसविण्याच्या कामाला गती दिली जाणार आहे. शहरातील विविध भागांत आतापर्यंत १ लाख ८० हजार मीटर बसविण्यात आले आहेत. महापालिकेने ज्या भागात मीटर बसविले आहेत, तेथे नागरिकांकडून क्षमतेपेक्षा अधिक पाणी वापरल्याचे उघडकीस आले आहे. पाण्याचा निश्चित वापर तसेच पाणीगळती थांबविण्यासाठी सर्वत्र मीटर बसविणे आवश्यक आहे. त्यामुळे, ज्या परिसरात मीटर बसविण्यासाठी विरोध केला जाईल, त्यांचे थेट नळजोडच बंद करण्याची कारवाई करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाने संबधित कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
मीटर तुटल्यास जबाबदारी ग्राहकांची
महापालिकेच्या वतीने बसविले जाणारे पाण्याचे मीटर पहिल्यांदा मोफत बसविले जाणार आहेत. यासाठी मीटरचा खर्च महापालिकेमार्फत करण्यास मुख्य सभेने मान्यता दिली आहे. हे मीटर नागरिकांच्या मिळकतीमध्ये त्यांच्या सूचनेनुसार योग्य ठिकाणी बसविण्यात येणार आहेत. हे मीटर सुस्थितीत व सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी संबधित रहिवाशांवर राहणार आहे. मीटर तुटला, खराब झाला किंवा चोरीला गेल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित ग्राहकावर असणार आहे, असे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळणे, सुरळीत पाणीपुरवठा न होणे, तसेच पाण्याची होणारी गळती यांसह पाण्याचा वापर किती होतो, हे समजावे, यासाठी पाण्याचे मीटर बसविणे आवश्यक आहे. मीटर बसविल्यानंतर पाण्याचा दैनंदिन वापर, त्याची मानांकनानुसार तुलना करणे, त्याद्वारे पुरेसा पाणीपुरवठा करणे याचे निश्चित प्रमाण ठरविणे शक्य होणार आहे. नंदकिशोर जगताप, पाणीपुरवठा विभाग प्रमुख, पुणे महापालिका