Pune Municipal Corporation Water Bill : महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या २३ गावांना पाणीपुरवठा करताना पालिकेला तारेवरची कसरत करावी लागत असताना या गावातील नागरिकांकडून २० टक्के दराने पाणीपट्टी आकारण्यात यावी, असा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. या गावांना महापालिकेकडून पुरेसे आणि नियमित पाणी पुरविले जात नसतानाही हा पाणीपट्टी आकारण्याचा प्रस्ताव आल्याने महापालिका विरुद्ध ग्रामस्थ असा नवा वाद होण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने २३ गावांतील नागरिकांना २० टक्के दराने पाणीपट्टी आकारण्यात यावा, असे पत्र कर आकारणी विभागाला दिले असून त्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. महापालिकेच्या हद्दीत म्हाळुंगे, सुस, बावधन बु., किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बु., होळकरवाडी, औताडे हांडेवाडी, वडाची वाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभुळवाडी, कोळेवाडी, वाघोली या २३ गावांचा समावेश झालेला आहे.

पालिका हद्दीत आलेल्या या २३ गावांच्या मिळकतकर देयकांमध्ये कोणत्या दराने पाणीपट्टी आकारावी, याबाबतचा पाणीपुरवठा विभागाकडे अभिप्राय मागविला होता. त्यावर अभिप्राय देताना सन २०२५-२६ च्या शहरातील पाणीपट्टीच्या दराच्या २० टक्के दराने या गावांतील नागरिकांकडून पाणीपट्टी आकारण्यात यावी, असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी कळविले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या या गावांना पालिकेच्या वतीने पुरेसा पाणीपुरवठा केला जात नाही. अनेक गावांना टँकरने पाणी द्यावे लागते. काही भागात अशुद्ध पाणी मिळते, या गावांकडे महापालिका सतत दुर्लक्ष करत असल्याची ओरड या भागातील नागरिकांकडून केली जाते. त्यातच २० टक्के पाणीपट्टी घ्यावी, असे सुचविण्यात आल्याने याला विरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.