पुणे : महापालिकेकडून शहरातील बांधकामांना सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले (एसटीपीचे) पाणी वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठीचे टँकर नागरिकांच्या लक्षात यावेत, या उद्देशातून सर्व टँकरला हिरवा रंग अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच या टँकरवर पिण्याचे नाही तर एसटीपीचे पाणी असे लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या टँकरला हिरवा रंग असेल त्यांनाच पाणी द्यावे, असे आदेश देण्यात आले असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.

खराडी येथील न्याती एलिसीया सोसायटीला खासगी टँकर पुरवठादाराकडून महापालिकेच्या एसटीपीचे पाणी पिण्यासाठी पुरविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. ठेकेदारांनी एसटीपीच्या पाण्याचे टँकर वेगळे ठेवण्याचे आदेश दिल्यानंतरही सोसायटीला अशा प्रकारे पाणी दिल्याचे समोर आल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिकेने एसटीपी पाण्याच्या टँकरला हिरवा रंग देणे बंधनकारक केले आहे. हिरव्या रंगाचे टँकर असतील तरच त्यांना एसटीपीचे पाणी द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या असून या निर्णयाची माहिती शहरातील सर्व सोसायट्यांनाही दिली जाणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : पुण्यातील सांडपाणी थेट नद्यांत! प्रदूषण नियंत्रण मंडळाचे महापालिकेवर कारवाईचे पाऊल

खराडी येथील सोसायटीला चक्क एसटीपीचे पाणी दिले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कोणती कलमे लावणे अपेक्षित आहे, अशी विचारणा पोलिसांनी शुक्रवारी महापालिकेकडे केली आहे. याबाबत महापालिकेच्या विधी विभागाकडून सार्वजनिक आरोग्यास धोका पोहोचविण्यासह इतर काही कलमांची माहिती खराडी पोलिसांना कळविण्यात आली आहे. त्यानुसार, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

हेही वाचा : भूसंपादनाअभावी रखडलेल्या स्पाइन रस्त्याचे काम प्रगतिपथावर; ‘या’ चार महामार्गाला जोडणार रस्ता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एसटीपीचे पाणी सोसायट्यांना दिले जात असल्याची तक्रार महापालिकेकडे आली आहे. त्याची शहानिशा केली जात आहे. संबंधित ठेकेदाराने सोसायटीला पुरविलेल्या पाण्याची गुणवत्ता तपासली जाणार आहे. यापुढील काळात पाणीपुरवठा करणाऱ्या ठेकेदारांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.