पुणे : हडपसर परिसरातील हांडेवाडी येथे प्रभू श्रीराम यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला महापालिकेच्या मुख्य सभेने मंजुरी दिल्यानंतर तो अभिप्रायासाठी राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला होता. त्यास सकारात्मक प्रतिसाद देण्यात आल्यानंतर महापालिकेने या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिली आहे.

हांडेवाडी येथील श्रीराम चौकामध्ये रामाचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा प्रस्ताव शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी महापालिकेला २०१८ मध्ये दिला होता. या खर्चाला महापालिकेने मान्यता द्यावी, असे या प्रस्तावात भानगिरे यांनी नमूद केले होते. महंमदवाडी-कौसरबागमधील हांडेवाडी येथे हा पुतळा उभारण्याचे नियोजित होते. या प्रस्तावाला स्थायी समितीने आणि त्यानंतर महापालिकेच्या मुख्य सभेने मान्यता दिली होती. मात्र, सार्वजनिक ठिकाणी पुतळा उभारावयाचा झाल्यास त्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाची मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यामुळे महापालिकेकडून हा प्रस्ताव राज्य शासनाच्या नगरविकास विभागाला पाठविण्यात आला होता.

हेही वाचा : काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी पुणे दौर्‍यावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाविकास आघाडीचे सरकार असताना हा प्रस्ताव रखडला होता. राज्यातील सत्ता समीकरणे गेल्या वर्षी बदलली आणि शिवसेना फुटून एकनाथ शिंदे आणि भाजपचे सरकार राज्यात आले. त्यानंतर भानगिरे यांनीही एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले. सध्या ते शहरप्रमुख असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. या प्रस्तावाला नगरविकास विभागाकडून मान्यता मिळावी, यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे नगरविकास विभाग, गृह विभाग आणि पोलीस महासंचालक कार्यालयाकडूनही या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. त्याबाबत महापालिकेला कळविण्यात आल्यानंतर महापालिकेनेही या प्रस्तावाला मंजुरी दिली.