पुणे : शहरातील रस्ते चकाचक करण्यासाठी पुणे महानगर पालिकेच्या वतीने १ ते ४ जुलै या काळात ‘डीप क्लीन’ मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेत प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांतील अंतर्गत एक महत्त्वाचा रस्ता अशा पद्धतीने विविध भागांतील सुमारे ६० रस्त्यांची स्वच्छता केली जाणार आहे. यामध्ये महापालिकेतील सर्व विभाग सहभागी होणार असून, या मोहिमेच्या यशानंतर इतर रस्त्यांची दुरुस्ती आणि स्वच्छता केली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली.
शहरातील रस्त्यांचा विकास करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून ही मोहीम राबवली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या वतीने ही मोहीम राबविण्यात आली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. या मोहिमेत क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या मुख्य रस्त्याची स्वच्छता तसेच दुरुस्ती केली जाणार आहे. महापालिकेचा पथ, मलनिस्सारण, अतिक्रमण, आकाशचिन्ह यासह विविध विभागातील कर्मचारी, अधिकारी या मोहिमेत सहभागी होणार आहेत.
रस्ते ‘डीप क्लीन’ झाल्यावर ते सुस्थितीत ठेवणे आणि त्यांच्यावर कायमस्वरूपी देखरेख ठेवणे शक्य होणार आहे. या मोहिमेत सर्व विभागांची यंत्रणा कामाला लावली जाणार आहे. फुटपाथ खराब असल्यास त्यांची दुरुस्ती, दुभाजकावर गवत उगवले असल्यास ते काढले जाईल. तसेच ड्रेनेज खराब असतील तर त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे, असेही दिवटे यांनी सांगितले.
शहरातील रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी डीप क्लीन मोहीम राबवली जाणार आहे. सुरुवातीला चार दिवस ही मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये रस्तेदेखील दुरुस्त केले जाणार आहेत. – ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका