पुणे : किरकोळ वादातून मित्राचा खून करून पसार झालेल्या तरुणाला आंबेगाव पोलिसांनी मध्य प्रदेशातील इंदूर शहरातून अटक केली. सूरज गणेश सूर्यवंशी (वय २२, रा. गणेश पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. रोहित नामदेव ढमाळ (वय २१, रा़ योगमुद्रा बिल्डिंग, भूमकर वस्ती, नऱ्हे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे़ याबाबत दीपक बंडगर (वय २१, रा. नऱ्हे) याने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक, सूरज आणि राेहित हे मित्र आहेत. सूरज आणि रोहित यांच्यात वाद झाले होते. १४ जून रोजी सूरज, दीपक, रोहित हे जांभूळवाडी तलाव परिसरात फिरायला गेले होते. रोहित आणि सूरज तलावाच्या बंधाऱ्याजवळ थांबून सिगारेट ओढत होते. दीपक याला धुराचा त्रास होत असल्याने तो लांब थांबला होता. त्या वेळी रोहित आणि सूरज यांच्यात पुन्हा वाद झाला. सूरजने रोहितच्या डाेक्यात दगड घातला. या घटनेत रोहित गंभीर जखमी झाल्याने दीपक घाबरला. तो घरी गेला. दुसऱ्या दिवशी घाबरलेल्या दीपकला आईने विचारणा केली. तेव्हा त्याने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर दीपक आंबेगाव पोलीस ठाण्यात गेला. त्याने या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली तेव्हा रोहित बंधाऱ्याजवळ मृतावस्थेत पडला होता. चौकशीत सूरजने रोहितच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची माहिती मिळाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूरजचा शोध सुरू करण्यात आला. तांत्रिक तपासात तो इंदूरला पसार झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला इंदूरमधून ताब्यात घेले. अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन चोरमले, सहायक निरीक्षक प्रियंका गोरे, उपनिरीक्षक मोहन कळमकर, मारुती वाघमारे, शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हणमंत मासाळ, विनायक पाडळे, नीलेश जमदाडे, सचिन तनपुरे, प्रमोद कांबळे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, सुभाष मोरे, हरीश गायकवाड, अजय कामठे यांनी ही कामगिरी केली.