पुणे : लष्कर भागातील छत्रपती शिवाजी मार्केटच्या छतावर तरुणाचा मृतदेह सापडल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. तरुणाच्या गळा आवळण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला आहे. शवविच्छेदन अहवालात तरुणाच्या मृत्यूमागचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती लष्कर पोलिसांनी दिली. दाऊद उर्फ शाकीर शेख असे मृतावस्थेत सापडलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर भागात छत्रपती शिवाजी मार्केट आहे. या बाजाराची जबाबदारी पुणे कटक मंडळ सांभाळते. मार्केटमधील गणपती मंदिराशेजारीच कटक मंडळाची खोली (स्टोअर रुम) आहे. या खोलीच्या छतावर दाऊदचा मृतदेह रविवारी दुपारी आढळून आला. दाऊद हा मार्केटमधील मटण विक्री दुकानात कामाला होता. तो त्याच्या पत्नीसह येरवड्यातील नागपूर चाळ येथे राहायला आहे. रविवारी दुपारी छत्रपती शिवाजी मार्केटच्या परिसरात दुर्गंधी पसरल्याची तक्रार या भागातील रहिवाशांनी पोलिसांकडे केली. पोलिसांनी पाहणी केली. तेव्हा छतावर दाऊदचा मृतदेह सापडला.

त्याच्या गळ्यावर आवळ्याचे व्रण आहेत. या प्रकरणी लष्कर पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदनात मृत्यूमागचे निश्चित कारण समजेल, अशी माहिती पोलिसांनी दिली. लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

छत्रपती शिवाजी मार्केट परिसरात अमली पदार्थ व्यसन करणाऱ्यांचा वावर आहे. किरकोळ कारणावरुन त्यांच्यात हाणामारीच्या घटना घडतात. अरुंद गल्ल्यांमध्ये खरेदीसाठी आलेल्या महिलांच्या पिशवीतून ऐवज चोरीला जाण्याच्या घटना घडतात. तेथून हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी आहे. छत्रपती शिवाजी मार्केट परिसरात फिरणारे चोरटे, अमली पदार्थांचे व्यसन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

दारू पिताना झालेल्या वादातून एकाला मारहाण

दारू पिताना झालेल्या वादातून एका तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून त्याला मारहाण करण्यात आल्याची घटना खराडी भागात घडली. याबाबत एका तरुणाने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण आणि त्याचा मित्र २ ऑगस्ट रोजी खराडी भागातील एका दुकानाजवळ दारू पित होते. त्या वेळी आरोपी तेथे आला. त्याच्यांत किरकोळ कारणावरुन वाद झाला. वादातून आरोपीने तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली, तसेच त्याला मारहाण केली. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक म्हेत्रे तपास करत आहेत.