संवादिनी या वाद्याच्या माध्यमातून आणि एकल सादरीकरणातून सुसंवाद (हार्मनी) आणि माधुर्य (मेलडी) या दोन्ही घटकांच्या नानाविध सांगीतिक शक्यता रसिकांसमोर मांडण्याची अनोखी संधी पुणेकर युवा संवादिनीवादक तन्मय देवचके यांना मिळाली आहे. जागतिक स्तरावर मान्यता पावलेल्या लंडन येथील ‘दरबार फेस्टिव्हल’च्या स्वरमंचावर या मैफलीच्या रूपाने प्रथमच एकल संवादिनीवादनाचे सूर निनादणार आहेत.

दरबार फेस्टिव्हलची सुरुवात झाल्यापासून प्रथमच संवादिनी या वाद्याचे एकल सादरीकरण तन्मय देवचके २६ ऑक्टोबर रोजी करणार आहेत. दरबार फेस्टिव्हलमध्ये तन्मय यांच्या होणाऱ्या सादरीकरणाची झलक पुणेकरांना त्यापूर्वी येत्या शनिवारी (११ ऑक्टोबर) अनुभवता येईल. इंडी म्युझिकॉन्स संस्थेच्या वतीने द बॉक्स २ येथे सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात तन्मय यांना सोहम गोराणे (तबला), यशवंत हंपीहोली (मृदंगम) आणि अनय लवाटे (सिंथेसायझर) साथसंगत करतील.

युवा पिढीचे आघाडीचे वादक असलेल्या तन्मय यांचे एकल वादन, कंठसंगीत साथसंगतकार, नृत्य संगतकार आणि लेहेरासाथ अशा सर्वच सादरीकरणावर प्रभुत्व आहे. भारतीय अभिजात संगीताला समर्पित असणारा देशाबाहेरील सर्वांत मोठा महोत्सव, अशी लंडनच्या दरबार फेस्टिव्हलची ओळख आहे. अशा व्यासपीठावर त्यांच्या संवादिनीवादनाची मैफल प्रथमच होणार आहे.

‘यापूर्वी दरबार फेस्टिव्हलमध्ये मी अनेकदा साथसंगतकार म्हणून सहभागी झालो आहे. मात्र, एकल वादन प्रथमच सादर करणार आहे. चार दिवसांच्या या महोत्सवात सांगतेच्या दिवशी माझे वादन होणार आहे. दोन महिन्यांच्या अमेरिका दौऱ्यामध्ये मी २० शहरांमध्ये एकल वादन प्रस्तुती केली. तेथील प्रतिसाद आणि रसिकांच्या भावना याचा मागोवा घेत दरबार फेस्टिव्हलच्या आयोजकांनी या जागतिक स्वरमंचावर मला संवादिनीवादनासाठी आमंत्रित केले आहे. पं. अनिंदो चटर्जी यांचे शिष्य विवेक पंड्या तबल्याची साथ करणार असून, हे वादन म्हणजे उस्ताद झाकीर हुसेन यांना ही सांगीतिक मानवंदना असेल,’ अशी भावना तन्मय देवचके यांनी व्यक्त केली.

‘संवादिनीची बलस्थाने एकल प्रस्तुतीतून रसिकांसमोर यावीत यासाठी गायकी आणि तंतकारी अंग यांचा मिलाफ करून प्रस्तुती करण्याचे मी ठरविले आहे. वादन करताना शार्प टोनसाठी आणि बेस टोनसाठी, अशा दोन स्वतंत्र संवादिनी वापरतो. त्यामुळे आवाजाच्या गुणवत्तेचा (टोनल क्वालिटी) पडणारा फरक रसिकांना अनुभवता येईल. पं. मनोहर चिमोटे यांनी सुरू केलेल्या स्वरमंडलच्या साथीच्या प्रभावाने मीदेखील त्याचा अंतर्भाव माझ्या वादनामध्ये केला आहे. एरवी साथीचे वाद्य अशी ओळख असलेल्या या वाद्याला मैफलीत मध्यवर्ती स्थान मिळावे, यासाठी प्रयत्न करणे, अशा अनेक आकांक्षा मनात बाळगून मी सादरीकरणाचा प्रयत्न करणार आहे’, असेही तन्मय यांनी सांगितले.

vidyadhar.kulkarni@expressindia.com