पुणे : ‘नांदी ते भरतवाक्य’ अशी परंपरा उलगडणाऱ्या १०१ नाट्यपदांच्या रंगमंचीय सादरीकरणावर आधारित ’नाट्य स्वर यज्ञ’ या विशेष कार्यक्रमाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌‍’मध्ये नोंद करण्यात आली आहे. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री जयमाला शिलेदार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘अश्विनी स्वरालय’तर्फे सादर करण्यात आलेला हा कार्यक्रम नाट्यसंगीत क्षेत्र आणि रसिकांच्या दृष्टीने अभिमानास्पद ठरला. पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा क्षण अनुभवला.

अश्विनी स्वरालयतर्फे आयोजित ‌‘नाट्य स्वर यज्ञ‌’ या विशेष कार्यक्रमात २२ संगीत नाटकातील १०१ नाट्यपदे सादर करण्यात आली. अश्विनी गोखले, निनाद जाधव, धनश्री खरवंडीकर, संपदा थिटे, चिन्मय जोगळेकर यांच्यासह स्वरालयातील ८ ते ८० वर्षे वयोगटातील ६५ विद्यार्थ्यांचा यात सहभाग होता. सकाळी नऊ वाजता सुरू झालेल्या ‌‘नाट्य स्वर यज्ञा’ची सायंकाळी सात वाजता सांगता झाली. कलाकारांना संजय गोगटे, हिमांशु जोशी (ऑर्गन), विद्यानंद देशपांडे, केदार परांजपे (तबला), अश्विनी गोखले, कार्तिकी वझे (संवादिनी), वसंत देव (टाळ) यांनी समर्पक साथसंगत केली. तर, वर्षा जोगळेकर आणि अनुपमा कुलकर्णी यांनी अभ्यासपूर्ण निवेदनाद्वारे जयमाला शिलेदार यांच्या संगीत-नाट्य क्षेत्रातील कार्याचा आढावा सादर केला. कार्यक्रमातील नाट्यपदांमधून साकारलेला भावाविष्कार, वातावरण निर्मिती, निसर्ग वर्णन, भक्तिरसाची निर्मिती यांची स्वरानुभूती रसिकांना भावली. प्रसिद्ध, प्रचलित तसेच क्वचितच ऐकावयास मिळणाऱ्या नाट्यगीतांचे सादरीकरण यात करण्यात आले.

एकाच कार्यक्रमात २२ मराठी संगीत नाटकातील १०१ पदे सादर केली गेली. या विक्रमाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌‍’मध्ये झाल्याची घोषणा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌‍’चे प्रतिनिधी अशोक अदक यांनी केली. अश्विनी स्वरालयाच्या संचालिका अश्विनी गोखले यांना प्रशस्तीपत्र आणि पदक प्रदान केले.

जयमाला शिलेदार यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून त्यांना मानवंदना देण्यासाठी शिष्य या नात्याने आयोजित केलेला ‌‘नाट्य स्वर यज्ञ‌’ यशस्वी झाला ही आनंदाची बाब आहे. जयमाला शिलेदार यांचा ज्ञानदानाचा वारसा पुढे सुरू रहावा यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात लहान मुलांचा सहभाग असल्याने त्यांनाही नाट्यसंगीताची ओळख होऊन गोडी निर्माण झाली आहे. ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌‍’ने या उपक्रमाची दखल घेतल्यामुळे मराठी संगीत रंगभूमीचा वारसा प्रवाहित राहण्यास नक्कीच मदत मिळणार आहे. – अश्विनी गोखले, संचालक, अश्विनी स्वरालय