पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये ३६ मीटर रुंदीचे रस्ते प्रस्तावित असून, त्यांची रुंदी गावठाणांच्या हद्दीत कमी करून २४ मीटर करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामपंचायतींनी केली आहे. सुरुवातीला हिंजवडी ग्रामपंचायतीने याबाबत विरोधाची भूमिका घेतली होती. आता माण ग्रामपंचायतीने याबाबतचा ठराव ग्रामसभेत मंजूर केला आहे. यामुळे आयटी पार्कमधील प्रस्तावित रस्त्यांबाबत तिढा निर्माण झाला आहे.

आयटी पार्कमध्ये अनेक रस्त्यांचे रुंदीकरण प्रस्तावित आहे. त्यात या रस्त्यांची रुंदी ३६ मीटर करण्यात येणार आहे. याला स्थानिक ग्रामपंचायतींनी विरोध दर्शविला आहे. याबाबत माण ग्रामपंचायतीने मंगळवारी झालेल्या ग्रामसभेत ठराव मंजूर केला. या ठरावानुसार, हिंजवडी-माण-घोडावडे राज्य मार्ग क्रमांक १३० सरसकट ३६ मीटर रुंद करण्याचे शासनाचे नियोजन आहे. माण गावठाणाच्या हद्दीत या रस्त्याच्या कडेला ग्रामस्थांची ५० ते ६० वर्षांपासून घरे आहेत. यामुळे रुंदीकरणात हे ग्रामस्थ बेघर होणार आहेत. त्यामुळे माण गावठाण हद्दीत हा रस्ता २४ मीटर करावा आणि गावठाणाच्या हद्दीबाहेर ३० मीटर करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या रस्त्याच्या कडेला ग्रामस्थांनी केलेली बांधकामे नियमित असूनही अतिक्रमण म्हणून काढण्यात येत आहेत. यालाही ग्रामस्थांचा विरोध आहे.

हिंजवडी ग्रामपंचायतीने गेल्या आठवड्यात याबाबत बैठक घेतली. या बैठकीत सर्व ग्रामस्थांनी गावठाणाच्या हद्दीत रस्त्यांची रुंदी कमी करण्याची भूमिका मांडली. आयटी पार्कमधील रस्त्यांच्या ३६ मीटर रुंदीकरणास कोणताही विरोध नाही. मात्र, गावठाणाच्या हद्दीत हा रस्ता २४ ते ३० मीटरच रुंद ठेवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. हा रस्ता ३६ मीटर रुंद केल्यास त्यात गावातील मंदिरे, शाळा, स्मशानभूमी आणि ग्रामपंचायत कार्यालयही प्रभावित होईल. याचबरोबर गेल्या ४०-५० वर्षांपासून तिथे राहणाऱ्या गावकऱ्यांची घरेही त्यात जाणार आहेत, असेही ग्रामस्थांनी स्पष्ट केले.

ग्रामसभेने संमत केलेला ठराव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. ग्रामस्थांची मागणी न ऐकता शासनाने जमिनीचे संपादन व रस्त्यांचे रुंदीकरण करू नये. अन्यथा, माण ग्रामस्थांचा त्याला तीव्र विरोध राहील. – अर्चना आढाव, सरपंच, माण

आयटी पार्कमध्ये रस्त्यांचे रुंदीकरण करताना गावठाणाच्या हद्दीत रस्त्याची रुंदी कमी ठेवावी, अशी सर्व ग्रामस्थांची मागणी आहे. याबाबत ग्रामपंचायतीने बैठकही घेतली होती. आम्ही आमच्या मागण्या शासकीय यंत्रणांसमोर मांडणार आहोत. – गणेश जांभूळकर, सरपंच, हिंजवडी