‘रेज ऑफ होप’ हा स्वाधार या सामाजिक संस्थेचा प्रकल्प ‘एचआयव्ही’शी लढणाऱ्यांसाठी आशेचा किरण ठरला आहे. गेली २० वर्षे सातत्याने सुरू असलेल्या या प्रकल्पामुळे मुलांना विविध पातळ्यांवर विकास दिसू लागला. या निमित्ताने या प्रकल्पाच्या प्रमुख सुनंदा टिल्लू यांच्याशी श्रीराम ओक यांनी साधलेला संवाद.

स्वाधार ही संस्था कधी सुरू झाली आणि कोणत्या गटासाठी कार्यरत आहे?

स्वाधार १९९५ मध्ये टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या प्रा. मीनाक्षी आपटे यांनी पुण्यात सुरू केली. वंचित वर्गातील स्त्रिया आणि मुले यांचा विकास घडवून त्यांना सक्षम करणे, जेणेकरून त्यांना मानाने आयुष्य जगता येईल, हा त्या मागील उद्देश. यातही, ज्या मुलांना समाजाने नाकारले, वाळीत टाकले, अशी एचआयव्हीबाधित आणि प्रभावित (पालक एचआयव्हीबाधित, परंतु मुले नॉर्मल) अशी मुले आणि देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांची मुले यांसाठी विशेष प्रकल्प सुरू केले.

‘रेज ऑफ होप’ प्रकल्प काय आहे?

या प्रकल्पाद्वारे एचआयव्हीबाधित आणि प्रभावित मुले, याशिवाय ग्रामीण/आदिवासी वस्त्यांमधील मुले यांच्या कुपोषणावर काम केले जाते. कुपोषणामुळे मुलांची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक वाढ खुंटते. ती शिक्षणात प्रगती करू शकत नाहीत, त्यांची शाळेतून गळती होऊ शकते. यातून मार्ग काढण्यासाठी प्रकल्पाने या मुलांना (कुटुंबाला) दर महिना प्रथिनयुक्त धान्याचा शिधा देण्यास सुरुवात केली. मुले अतिकुपोषित गटातून सामान्य गटात यावीत, शिक्षण पुरे करून स्वतःच्या पायावर उभी राहावीत, यासाठी गेली वीस वर्षे झटून प्रयत्न केले जात आहेत. या प्रकल्पाची जबाबदारी ‘स्वाधार’ने तेव्हा मी आणि सुजाता पेंडसे यांच्याकडे दिली. प्रकल्पामध्ये सामाजिक कार्यकर्त्या उषा देशपांडे, आशा सागर, मंगल बागल, ज्योती जगताप, अनन्या नवार, स्नेहा बाविस्कर आणि आमचे सदस्य यांचे योगदानही अतिशय महत्त्वाचे आहे.

प्रकल्प सुरू करण्यामागील उद्देश काय होता?

सन २००५ मध्ये जेव्हा प्रकल्प सुरू झाला, तेव्हा एचआयव्ही या विषाणूबद्दलची माहिती त्रोटक आणि अनेकदा चुकीची मिळत होती. याची चाचणी करून घेण्यासही कोणी उत्सुक नसायचे, चाचणी करवून घेणाऱ्यांच्या मनात भीती असायची. एकीकडे घरातील कर्ते पुरुष मरण पावत होते, मुले अनाथ होत होती. काही मुलांवर तर बालकामगार होण्याची वेळ आली होती आणि याला आवर कसा घालायचा, हे कुणाच्या लक्षात येत नव्हते. जे काही उपाय योजले जात होते, ते तरुण, मोठ्या माणसांसाठी मुख्यत्वे केले जात होते; परंतु यामध्ये मुलांची जी होरपळ होत होती, त्याकडे फारसे लक्ष दिले जात नव्हते. अशा कठीण काळात Save the Children, Canada & UK या संस्थांनी मुलांची जबाबदारी उचलण्याचे ठरविले. स्वाधार ही सेवाभावी संस्था जबाबदारी उचलण्यास तयार झाली.

सध्या प्रकल्पातील लाभार्थ्यांसाठी कोणकोणत्या उपाययोजना करण्यात येतात?

सध्या प्रकल्पात २३० मुले एचआयव्हीबाधित/प्रभावित, शिवाय १५० मुले ग्रामीण भागातील आहेत. ही मुले एचआयव्हीबाधित नाहीत; परंतु अतिकुपोषित आहेत. अशी सगळी मिळून सध्या ‘रेज ऑफ होप’ ३८० मुले व त्यांचे कुटुंब (१ युनिट = ४ सदस्य) अशी १५२० लाभार्थ्यांची जबाबदारी उचलत आहे. यातील एचआयव्हीबाधित मुलांना ART (antiretroviral therapy) तर दिली जातेच; याशिवाय प्रथिनयुक्त आहार सगळ्या लाभार्थ्यांना दिला जातो. या बाधित मुलांना सरकारी रुग्णालये, तसेच ART सेंटरमधून विनाशुल्क गोळ्या दिल्या जातात. ही मुले साधारणपणे १३-१४ वर्षांची झाली, की त्यांना आजारपणाची कल्पना दिली जाते आणि त्याबरोबरच धोके आणि काळजी याविषयी सविस्तर सांगितले जाते. या मुलांना अनेकदा समुपदेशनाचीही गरज भासते, तेही वेळोवेळी केले जाते. मुलांनी कुपोषणापासून दूर राहावे, यासाठीही या प्रकल्पांतर्गत विविध योजना राबविल्या जातात. या वीस वर्षांच्या काळात ही मुले मोठी होत असताना मुले आणि पालक यांना होत असलेला फायदा पाहून माझ्यासह आमच्या सर्वच कार्यकर्त्यांमध्ये निश्चितपणे समाधान आहे.

shriram.oak@expressindia.com